Crime News: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 39 वर्षीय महिलेने आपल्या 'लिव्ह-इन पार्टनर'सोबत (सह-जोडीदार) मिळून स्वतःच्याच 5 वर्षांच्या निष्पाप मुलीला संपवलं. ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या दोघांच्या प्रेमसंबंधात ही लहान मुलगी अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून तिने मुलीला संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वडिलांच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी या 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता, तिची ओळख 'वेनेला' अशी पटली आहे. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी 4 जून रोजी कडुगोडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीपासून वेगळी राहणारी प्रियंका आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर मोहन यांच्याविरोधीत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वडिलांच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी मोहन याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
वैवाहिक वाद आणि अफेअर ठरले कारण
दाखल झालेल्या एफआयआर (FIR) नुसार, तक्रारदार वडिलांचे प्रियंकासोबत 2007 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुली आहेत. मात्र, कालांतराने त्यांच्या वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली. दरम्यान, 2015 मध्ये मोहन या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क आल्यानंतर प्रियांका त्याच्या जवळ आली. यानंतर प्रियंकाने पतीवर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला आणि ती मोहनसोबत राहू लागली. या वादात मोठी मुलगी वडिलांसोबत राहत होती, तर धाकटी मुलगी वेनेला आई प्रियंकासोबत राहत होती.
हेही वाचा – Nasrapur Crime Case : संतापजनक! नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांचा सोशल मीडियावर छळ
शवविच्छेदन अहवालाने बळावला संशय
मुलीच्या मृत्यूनंतर प्रियंकाने तिच्या मृत्यूबाबत वारंवार परस्परविरोधी विधाने केली, ज्यामुळे वडिलांचा संशय बळावला. प्रियंकाने सुरुवातीला सांगितले की, 24 मार्चच्या रात्री मुलीने बिर्याणी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती मृत आढळली. नंतर तिने दुसरा दावा केला की, कोलारमधील एका कॅफेमध्ये तिचा वाढदिवस साजरा करत असताना मुलीला एअर-कंडिशन्ड (एसी) कारमध्ये झोपवून ठेवले होते, जिथे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वडिलांनी तो अहवाल इंग्लंडमध्ये बालरोगतज्ज्ञ असलेल्या आपल्या बहिणीला दाखवला. त्यातून मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आरोपींनी मुलीला आपल्या आयुष्यातील अडथळा समजून तिला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, या आरोपाखाली पोलीस आता पुढील तपास करत आहेत.