Crime News: तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात नागार्जुन पब्लिक स्कूलच्या 48 वर्षीय मुख्याध्यापिका आणि संचालिका कल्लू रूपा रेड्डी यांना त्यांच्याच राहत्या घरी अत्यंत निघृणपणे संपवण्यात आलं. आता पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. या खळबळजनक प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दहावीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या वस्तूंवरून शाळेतून करण्यात आलेली हकालपट्टी, त्यातून मनात धरलेला राग आणि एकाच रात्रीत श्रीमंत होऊन आलिशान आयुष्य जगण्याची हाव, यातूनच या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हे भयंकर कृत्य रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
'बाबू' या एकाच शब्दाने फिरवली तपासाची चक्रे
12 ऑगस्ट रोजी रूपा रेड्डी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला होता. त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने तब्बल 27 वार करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ 5 पथके तयार केली आणि सुमारे 80 हून अधिक संशयितांची चौकशी केली. मात्र, तपासाला खरा वेग मिळाला तो रूपा रेड्डी यांच्या अखेरच्या फोन कॉलमुळे. फोन बंद होण्यापूर्वी त्यांनी आपल्या नातेवाईकाशी बोलताना 'बाबू' या स्थानिक शब्दाचा प्रयोग केला होता. यावरून पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आणि अनुपस्थित असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.
मंकी कॅप सरकली अन् ओळख पटली
पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, वसतिगृहात चोरी करताना पकडले गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेचा बदला घेण्याची योजना आखली होती. 'कमी वेळेत झटपट पैसे कसे कमवायचे' याचे युट्यूब व्हिडीओ पाहून त्यांनी चोरीचा कट रचला. हातमोजे आणि मंकी कॅप घालून घरात घुसलेल्या एका विद्यार्थ्याला 2.5 लाख रुपये सापडले, मात्र अचानक मंकी कॅप सरकल्याने मुख्याध्यापिकेने त्याला ओळखले. स्वतःचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीपोटी आरोपीने रूपा रेड्डी यांच्यावर प्राणघातक वार केले. हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे गाडून हे विद्यार्थी चोरीच्या पैशांवर थेट गोव्याला फिरायला गेले आणि महागडे आयफोन खरेदी करून पार्ट्या करू लागले.
अतिउधळपट्टीमुळे संशय बळावला; रक्ताळलेल्या नोटांसह मुद्देमाल जप्त
संशयित विद्यार्थ्यांकडे अचानक आलेला पैसा आणि त्यांची उधळपट्टी यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 1.54 लाख रुपयांची रोकड, एक नवीन आयफोन आणि मृत मुख्याध्यापिकेचा मोबाईल जप्त केला आहे. अल्पवयीन मुलांच्या या भीषण गुन्हेगारी वृत्तीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र आणि समाजमन सुन्न झाले आहे.