Gurugram Hit And Run Case: हरियाणातील गुरुग्राम येथे गोल्फ कोर्स रोडवर एक अत्यंत धक्कादायक हिट अँड रनचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर 'rebelwheels_sia_' हे इन्स्टाग्राम पेज चालवणारी सिया नावाची महिला स्पोर्ट्स बाईकर आपल्या रायडिंग ग्रुपसोबत जात असताना हा अपघात काही हुल्लडबाजांनी घडवून आणला. एका कारमधील काही तरुणांनी सुरुवातीपासूनच सियाच्या 'Aprilia RS 457' या स्पोर्ट्स बाईकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. ते तरुण नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांनी रस्त्यावर जाणीवपूर्वक बेदरकारपणे गाडी चालवत हुल्लडबाजी सुरू केली होती.
अंतर ठेवून राहण्यास सांगताच थेट बाईकला मारली जोरदार धडक
सुरक्षेचा विचार करून सियाने कारचालकाला बाईकपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले होते. यावर त्या तरुणांनी तिला बाईक थांबवण्याची धमकी दिली. सियाच्या मित्राने तिच्या सुरक्षेसाठी कारला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु संतापलेल्या कारचालकाने अत्यंत वेगाने सियाच्या बाईकला कट मारत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सिया थेट रस्त्यावर फेकली गेली आणि तिची महागडी स्पोर्ट्स बाईक काही मीटरपर्यंत फरफटत गेली.
हेल्मेट कॅमेऱ्यात सर्व थरार कैद; अपघातानंतर कारचालकाचा पोबारा
हा संपूर्ण अंगावर काटा आणणारा प्रकार सियाच्या बाईकवर बसवलेल्या हेल्मेट कॅमेऱ्यात जसाच्या तसा कैद झाला आहे. अपघातानंतर कारचालक मदतीसाठी थांबण्याऐवजी घटनास्थळावरून वेगाने पसार झाला. ट्रॅफिक सिग्नलवर सियाच्या एका मित्राने त्या कारचा पाठलाग करून चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने आपली चूक अमान्य करत तिथूनही पळ काढला. या भयानक घटनेनंतर सियाने गुरुग्रामच्या रस्त्यांवर महिला रायडर्सच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; गुरुग्राम पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कारचा नोंदणी क्रमांक आणि मालकाचे नाव सार्वजनिक केले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. युजर्सनी दिल्ली आणि हरियाणा पोलिसांना टॅग करत मुजोर कारचालकाविरोधात तात्काळ एफआयआर (FIR) नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.