Crime News: बंगळुरूमध्ये एक मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जन्माला आलेल्या अवघ्या 4 महिन्यांच्या दोन जुळ्या मुलींना त्यांच्याच आईने संपवल्याचं समोर आलं आहे. या 40 वर्षीय महिलेने बालकांना संपवल्यानंतर स्वतःही गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजराहल्ली येथील राहत्या घरी मंगळवारी हा प्रकार घडला. उमा देवी असे आरोपी महिलेचे नाव असून ती पती रामलिंगप्पा, जुळ्या मुली आणि सासू यांच्यासोबत राहत होती. तिचा पती रिअल इस्टेट क्षेत्रात व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे.
IVF उपचारांनंतर 5 मे 2026 रोजी झाला होता जुळ्या मुलींचा जन्म
आरोपी महिलेचा पती रामलिंगप्पा याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न सुमारे 24 वर्षांपूर्वी, म्हणजे 2002 मध्ये झाले होते. अनेक वर्षे मूल होत नसल्यामुळे या दांपत्याने वैद्यकीय मदतीने आयव्हीएफ (IVF) उपचारांचा पर्याय निवडला होता. या यशस्वी उपचारानंतर उमा गर्भवती राहिली आणि 5 मे 2026 रोजी तिने दोन सुंदर जुळ्या मुलींना जन्म दिला. 24 वर्षांनंतर घरात पाळणा हलल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि 1 सप्टेंबर रोजी या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
बाळंतपणानंतरचे नैराश्य आणि असामान्य वर्तन
मुलींच्या जन्मानंतर काही दिवसांतच उमा देवीच्या वर्तनात विचित्र बदल घडून आले होते. तिची लहान मुलींबद्दलची भावनिक ओढ पूर्णपणे संपली होती आणि तिने अनेकदा पतीकडे मुलींना एखाद्या आश्रमात सोडून देण्याचा हट्ट धरला होता. तिच्या या असामान्य वर्तनामुळे कुटुंबाने तिला राघवेंद्र हॉस्पिटल आणि निमहन्स (NIMHANS) येथे मानसोपचारासाठी दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी बाळंतपणानंतर होणारे तीव्र नैराश्य (postpartum depression) आणि संप्रेरकांमधील (hormonal imbalances) असंतुलनामुळे तिच्यात हे बदल झाल्याचे स्पष्ट केले होते.
दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा उघडकीस आला प्रकार
1 सप्टेंबर रोजी घटनेच्या वेळी पती रामलिंगप्पा काही कामा निमित्त बाहेर गेला होता. दुपारी घरी परतल्यावर त्याला बेडरूम आतून बंद असल्याचे आढळले. संशय आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पत्नी ओढणीच्या साहाय्याने जीनव संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्याच खोलीत दोन्ही चिमुकल्या मुलींचे मृतदेह पडलेले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. प्राथमिक वैद्यकीय तपासात चिमुकल्यांचा मृत्यू पाण्यात बुडवून करण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.