Delhi Crime: राजधानी दिल्लीतील दक्षिण दिल्ली भागात असलेल्या प्रसिद्ध काकाजी मंदिर परिसरात एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी, 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत मंदिरात असताना पोलिसांच्या वेशात आलेल्या ३ नराधमांनी त्यांना घेरले. पोलीस असल्याचे भासवून त्यांनी पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत या दोघांना मंदिर परिसरातील एका एकांत पार्कमध्ये नेले आणि तिथे मुलीवर अत्याचार केला.
तक्रार मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल; पीडितेला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. सुमारे रात्री 8:45 च्या सुमारास पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे या गुन्ह्याची माहिती मिळाली होती. दिल्लीची रहिवासी असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, तिचा रीतसर जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या भयानक प्रकरणी पोलिसांनी सर्व ३ आरोपींविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यासह इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – Nagpur Crime: दारूसाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाचा संताप अनावर; चाकूने आईवर…; नागपुरात खळबळ
आरोपी आसिफसोबत पोलिसांची चकमक; पायात गोळी मारून केली अटक
तपासा दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला हटकले असता त्याने पोलिसांच्या दिशेने हवेत 3 गोळ्या चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका गोळी आरोपीच्या उजव्या पायाला लागली, ज्यानंतर त्याला जागीच पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आसिफ असे असून तो ओखला मंडी परिसरात काम करतो असे तपासात निष्पन्न झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू
या घटनेतील इतर दोन फरार आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. मंदिर आणि पार्क परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची बारकाईने पाहणी केली जात असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. राजधानीतील मंदिराजवळ घडलेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमधून आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.