Software Engineer Death: जयनगर येथील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या रोशन जमीर या तरुणाने राहत्या घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. रविवारी, 9 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृत रोशनच्या मोबाईलमध्ये एक धक्कादायक मेसेज आढळून आला, ज्याने या आत्महत्येमागील रहस्य उघड केले.
विवाहाच्या 1 महिन्यातच टोकाचे पाऊल; पत्नी अन् सासरच्यांवर आरोप
रोशनचा विवाह अवघ्या 1 महिन्यापूर्वी इक्रा फातिमा हिच्यासोबत झाला होता. सुरुवातीला काही दिवस सुरळीत चालल्यानंतर लग्नानंतर अवघ्या 8 दिवसांत दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि इक्रा माहेरी निघून गेली. रोशन सतत त्यांच्यातील वाद मिटवून संसार पुन्हा सुरू करण्यासाठी तिच्या माहेरी जात होता; परंतु, सासरच्या मंडळींकडून त्याचा सातत्याने मानसिक छळ करण्यात आला, असे त्याचे म्हणणे होते. यासंदर्भात त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडलेल्या मेसेजमध्ये रोशनने आपली पत्नी इक्रा फातिमा, तिचे आई-वडील आणि इतर नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळूनच जीवन संपवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. कर्नाटकातील बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील कनकपुरा येथून ही अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
घरात घुसून दागिने लांबवले; पोलिसांत खोटी तक्रार केल्याचा दावा
मृत रोशनचे वडील अन्वर पाशा यांनी या प्रकरणी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे. रोशन कामावर गेलेला असताना इक्राच्या माहेरच्या लोकांनी घरात घुसून सर्व मौल्यवान वस्तू आणि दागिने काढून घेतले; तसेच, त्याला मानसिकदृष्ट्या खचवून टाकण्यासाठी बसवनगुडी महिला पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची खोटी तक्रार दाखल केली, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या अपमानामुळे आणि मानसिक त्रासामुळे रोशन गंभीर तणावाखाली होता.
पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू
रोशनच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि मोबाईलमधील मेसेजच्या आधारे कनकपुरा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी मृत रोशनची पत्नी इक्रा फातिमा आणि तिच्या नातेवाइकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.