Hyderabad Fake Notes Racket Bust: हैदराबादमध्ये शमशाबाद झोनच्या टास्क फोर्स आणि बालापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून 1 फरार सहकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पाठिंबा न घेता, केवळ YouTube आणि Instagram वरील व्हिडिओ पाहून आरोपींनी घरातच बनावट नोटा बनवण्याचे तंत्र शिकले होते. या धाडीत पोलिसांनी तब्बल 2,91,100 रुपये मूल्याच्या 1,124 बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
डिलिव्हरी बॉय, रॅपिडो ड्रायव्हर अन् रिक्षाचालक; असा उघड झाला काळा धंदा
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामावत रामू (36), रामावत मोतीलाल (35) आणि रामावत गांधी (19) यांचा समावेश असून ते तेलंगणातील चिंतल थांडा येथील रहिवासी आहेत. दिवसा हे आरोपी अनुक्रमे झोमॅटो डिलिव्हरी वर्कर, रॅपिडो बाईक ड्रायव्हर आणि ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करून सामान्य जीवन जगत होते. मात्र, रात्रीच्या वेळी घरातच बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असायचा. या गुन्ह्यात त्यांचा सुधीर जॉन चेला उर्फ वामशी हा सहकारी मदत करत होता, जो सध्या फरार आहे.
आर्थिक अडचणींमधून गुन्हेगारीच्या जगात प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामू याच्या कुटुंबावर अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे त्याने आपले नातेवाईक मोतीलाल याच्याशी चर्चा केली. झटपट पैसे कमावण्याच्या इच्छेतून दोघांनी इंटरनेटवर बनावट नोटा बनवण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहताना एका मोबाईल नंबरद्वारे त्यांनी एका अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर मिळालेल्या सूचनेनुसार प्रिंटर, स्कॅनर आणि उच्च दर्जाचा कागद खरेदी करून त्यांनी नोटा बनवण्याची तयारी सुरू केली.
प्रिंटर, स्कॅनर अन् वॉटरमार्क वापरून केली खऱ्या नोटांची नक्कल
आरोपींनी एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेटर आणि बॉण्ड पेपरचा वापर करून 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा तयार केल्या. नोटा खऱ्या दिसण्यासाठी महात्मा गांधींचे फोटो, वॉटरमार्क आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्यांची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. धाडीदरम्यान पोलिसांनी प्रिंटींग साहित्यासह लॅमिनेटर, पेपर कटर, रंगीत द्रव आणि कागदाचे गठ्ठे हस्तगत केले असून या संपूर्ण जाळ्याचा कसून तपास सुरू आहे.