पती- पत्नी म्हटलं की लहान-लहान गोष्टींवरुन दोघांमध्ये वाद होणं साहजिकच आहे. कधी मुलांवरुन, तर कधी घरातील एखाद्या किरकोळ कारणावरुन किंवा एकमेकांच्या आवडीनिवडीवरुनही त्यांच्यात खटके उडत असतात. मात्र, हे त्यांच्यातील वाद काही वेळातच मिटतात आणि नातं पुन्हा पूर्वीसारखं होतं. पण सध्या समोर आलेला प्रकार मात्र अंगावर काटा आणणारा आहे. फक्त भाजी बनवण्यावरुन पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचा शेवट इतका भयंकर झाला की, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
पतीने टोकाचं पाऊल उचललं
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तिगरी परिसरात ही संपूर्ण घटना घडली असून याच परिसरात कमलेश आणि पूनम हे आपल्या तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास कमलेश आणि पूनम यांच्यात भाजी बनवण्यावरून वाद सुरु झाला. सुरुवातील अतिशय क्षुल्लक गोष्टींवरुन सुरु असलेला वाद वाटत होता. मात्र, भाडंणात कमलेशचा राग इतका टोकाला गेला की, त्याने पूनमवर गोळी झाडली. गोळी लागल्याने पूनमचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळी झाडल्यानंतर संबंधित घरातून मोठा आवाज आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पूनमच्या घराच्या दिशेने धाव घेत दरवाजा ठोठावला. मात्र, कमलेशने काही वेळ घाबरुन दरवाजा उघडलाच नाही. दरम्यान, घराच्या आत असलेल्या तीन मुलांच्या रडण्याचा आवाजही शेजाऱ्यांना ऐकू आला. त्यामुळे परिसरातील जमललेल्या नागरिकांनी कमलेशला आवाज देत लगेच दरवाजा उघडण्यास सांगितले.
शेजाऱ्यांना सांगितली धक्कादायक कहाणी
काही वेळाने कमलेश हा घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी स्वत:चावर गुन्हा लपवण्यासाठी त्याने शेजाऱ्यांना पूनमचे स्वत:वरच गोळी झाडून घेतल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या या बोलण्यावर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी कमलेशला तिथेच पकडून ठेवले आणि तातडीने सर्व माहिती पोलिसांना कळवली.
हेही वाचा-Raigad Crime News: रायगड जिल्हा हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून अत्याचार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील पूनमचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमागील नेमका वाद काय झाला, कमलेशकडे गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कुठून आले, यासर्वांचा पोलीस तपास करत आहे.