Crime News: पवित्र रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथून बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री रुरकी येथील गंगनाहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भावाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच दोन सख्ख्या बहिणींना गोळ्या झाडून संपवलं. अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या अंतरात आरोपीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा भीषण रक्तपात घडवून आणला. या हल्ल्यात आरोपीचा मेहुणाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
10 मिनिटांच्या अंतराने दोन ठिकाणी गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विवेक कुमार ऊर्फ विकी याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणला. मंगळवारी रात्री सर्वप्रथम तो त्याची पहिली बहीण पुष्पा हिच्या घरी पोहोचला आणि तिच्यावर थेट गोळ्या झाडल्या. पुष्पाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर, तिथून तात्काळ निघून आरोपी सुमारे 10 ते 15 मिनिटांत त्याची दुसरी बहीण शकुंतला हिच्या घरी धडकला. तेथे त्याने शकुंतला आणि तिचा पती यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात शकुंतलाचाही जागीच अंत झाला, तर तिचा पती अनेक गोळ्या लागल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अवघ्या 15 मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण रुरकी शहर हादरले आहे.
आरोपीला उशिरा रात्री अटक; पोलीस तपास तीव्र
रक्तपात केल्यानंतर आरोपी विवेक कुमार घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच गंगनाहर पोलीस दलाने तातडीने धाव घेत परिसर वेढा घातला. घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत उशिरा रात्री आरोपी विकी याच्या मुसक्या आवळल्या. ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक (SP) शेखर चंद सुयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आरोपीला बहिणींच्या चारित्र्यावर संशय असल्याचे समोर आले आहे. मात्र, या गुन्ह्यामागे आणखी काही कौटुंबिक किंवा आर्थिक वाद आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा – Latur: लातूर हादरलं! खासगी रुग्णालयात बेकायदेशीर सिझेरियन; शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू
नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ
रक्षाबंधनासारख्या सणाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून होणाऱ्या अशा हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रुरकीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा नात्यांमधील वाढता हिंसाचार ऐरणीवर आला आहे.