Crime News: देशाची राजधानी दिल्लीत महिला आणि बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपात ऐरणीवर आला आहे. स्वरूप नगर येथील कुशक रोडवर असलेल्या एका शेतात एका अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या आणि अत्यंत भयावह अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नराधमांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने भोसकून तिला संपवलं आणि मृतदेह निर्जन शेतात फेकून दिला. अनेक दिवस मृतदेह उघड्यावर पडून राहिल्यामुळे भटक्या कुत्र्यांनी शरीराचे लचके तोडले होते, ज्यामुळे पोलिसांना सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणेही कठीण झाले होते. 13 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
दारूच्या नशेत टेम्पोमध्येच रचला अत्याचाराचा कट
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. घटनेच्या दिवशी हे सर्वजण एका वाहनातून एकत्र प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर नराधमांनी चालत्या वाहनातच या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी तिला संपवलं आणि मृतदेह निर्जन शेतात फेकून पसार झाले. पीडित मुलगी वारंवार घर सोडून जात असल्याने कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली नव्हती, ज्याचा गैरफायदा आरोपींनी घेतला.
50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीनंतर पोलिसांना यश
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ विशेष पथक स्थापन केले आणि परिसरातील सुमारे 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. रात्रीच्या अंधारामुळे वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी त्या मार्गावरील संशयित वाहनांचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर 15 आणि 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी संशयित टेम्पो जप्त केला आणि चालकाला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणात शिवम ऊर्फ सुदामा या मुख्य आरोपीसह 16 ते 17 वर्षे वयोगटातील 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले चाकू, रक्ताने माखलेले कपडे जप्त केले असून बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत कडक कारवाई सुरू केली आहे.