Crime News: क्रूरतेचा कळस! घरगुती वादातून पती अन् सासूने बळजबरीने पाजलं टॉयलेट क्लिनर; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

घरगुती वादातून एका निष्ठुर पती आणि सासूने स्वतःच्याच घरातील विवाहितेला बळजबरीने विषारी टॉयलेट क्लिनर पाजले.

Crime News: क्रूरतेचा कळस! घरगुती वादातून पती अन् सासूने बळजबरीने पाजलं टॉयलेट क्लिनर; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Crime News:  पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका निष्ठुर पती आणि सासूने स्वतःच्याच घरातील विवाहितेला बळजबरीने विषारी टॉयलेट क्लिनर पाजले. नेहा असे मृत महिलेचे नाव आहे. या विषारी द्रव्यामुळे महिलेची प्रकृती अत्यंत बिघडल्याने तिला तातडीने जालंधर येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

व्हेंटिलेटरवर सुरू होती मृत्यूशी झुंज; आरोपी 6 वर्षांच्या चिमुकलीसह फरार
रुग्णालयात दाखल केल्यानंतर नेहाची प्रकृती कमालीची खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, अवयव निकामी झाल्याने तिने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. घटनेनंतर मृत महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असता, आरोपी पती आणि सासू तिच्या 6 वर्षांच्या लहान मुलीला सोबत घेऊन तिथून पसार झाले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पीडित कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी लावून धरली आहे.

अनैतिक संबंधांच्या वादातून गुन्हा झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पतीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांना नेहाचा तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये रोजच्या रोज कडाक्याचे भांडण होत असे. याच रागातून पती आणि सासूने कट रचून नेहाला जबरदस्तीने टॉयलेट क्लिनर पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती आणि सासूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

हेही वाचा – Crime News: लग्नाला अवघे 4 महिने अन् पोटात 3 महिन्यांचं बाळ… संरक्षण मंत्रालयातील गरोदर ASO ने उचललं टोकाचं पाऊल

न्यायाधीशांसमोर नोंदवला होता लेखी जबाब 
दरम्यान, मृत्यूशी झुंज देत असताना पीडित नेहाने न्यायाधीशांसमोर आपला अंतिम लेखी जबाब नोंदवला होता. या जबाबात तिने पती आणि सासूच्या क्रूर कृत्याचा पाढा वाचल्याचे समजते. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला असून, वैद्यकीय अहवाल आणि मृत महिलेचा अंतिम जबाब तपासात मुख्य पुरावा म्हणून समाविष्ट केला जात आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके ठिकठिकाणी छापे टाकत असून, आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number