Crime News : आंध्र प्रदेशातील नंदीयाल जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या जगप्रसिद्ध श्रीशैलम तीर्थक्षेत्रातून एक अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. श्री सत्य साई जिल्ह्यातील बट्टलापल्ली गावचे रहिवासी असलेले हे कुटुंब गेल्या महिन्याच्या 28 तारखेला एका ऑटो-रिक्षाने श्रीशैलम येथे दाखल झाले होते आणि त्यांनी तिथल्या लॉजमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. डोक्यावर असणारा प्रचंड कर्जाचा डोंगर आणि ढासळलेली आर्थिक स्थिती या दुर्दैवी निर्णयामागे कारणीभूत असावी, असा प्राथमिक संशय पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
सुरुवातीच्या काही दिवसांत हे सर्व सदस्य नियमितपणे दर्शनासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी जायचे आणि रात्री जेवणासाठी लॉजवर परत यायचे. परंतु, सलग 3 दिवसांपासून खोलीचा दरवाजा आतून बंदच होता आणि बाहेर कोणीही आले नव्हते. दरम्यानच्या काळात खोलीतून अत्यंत तीव्र दुर्गंधी पसरू लागल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांना व व्यवस्थापकाला शंका आली. त्यांनी खिडकीच्या फटीतून आत डोकावून पाहिले असता, खोलीत 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. हे भीषण दृश्य पाहताच लॉज प्रशासनाने तातडीने स्थानिक श्रीशैलम पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच डीएसपी रामंजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि पंचनामा करून सर्व 5 मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये सुधाकर (36), गोगुला आदिलक्ष्मी (50), मल्लेश्वरी (45), श्रीदेवी (33) आणि मणिकंठा (15) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात मृत महिलांपैकी 3 जणी एकमेकींच्या बहिणी होत्या; ज्यातील दोघींचा पतीने त्याग केला होता तर एक अविवाहित होती. कुटुंबातील सर्वात लहान मुलाचे वय अवघे 15 वर्षे होते.
या घटनेची गंभीर दखल घेत श्रीशैलम देवस्थानचे अध्यक्ष पोथुगुंटा रमेश नायडू व कार्यकारी अधिकारी श्रीनिवासराव यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. नियमानुसार 48 तासांपेक्षा जास्त काळ या कुटुंबाला तिथे राहण्यास कशी परवानगी दिली, यावरून त्यांनी लॉज व्यवस्थापनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त करत नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले. डीएसपी नाईक यांनी स्पष्ट केले की पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तसेच, गंभीर आर्थिक किंवा कौटुंबिक संकटात सापडलेल्या नागरिकांनी आत्मघाती पाऊल न उचलता पोलीस किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.