Delhi Kashmere Gate Bus Gangrape: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका अमानुष गुन्ह्याने हादरली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असलेली 11 वीची 16 वर्षीय विद्यार्थिनी चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचाराची शिकार झाली. परी चौक ते काश्मिरी गेट दरम्यानच्या 47 किलोमीटरच्या प्रवासात बसचा चालक आणि कंडक्टर यांनी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारांनंतर नराधमांनी तिला काश्मिरी गेट परिसरातील रिंग रोडवर फेकून दिले आणि तेथून पळ काढला.
मदतीच्या बहाण्याने बसमध्ये चढवून अत्याचार
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी ही मुलगी कौटुंबिक वादानंतर घरातून न सांगता नोएडा येथील नातेवाईकाकडे जाण्यासाठी निघाली होती. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून परी चौक येथे उतरली. तेथून नोएडा सेक्टर-63 ला जाण्यासाठी तिने एका मोकळ्या एसी स्लीपर बसला हात दाखवला. बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचा फायदा घेत कंडक्टर संदीप आणि चालक कुलदीप यांनी तिला धमकावत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. बसच्या खिडक्यांवर पडदे असल्यामुळे बाहेरून कोणालाही आत घडणारा भयानक प्रकार दिसला नाही.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक
काश्मिरी गेट बस स्थानकाजवळ सोडल्यानंतर पीडितेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आपबिती सांगितली. काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या पथकाने वैद्यकीय तपासणीनंतर अपहरण, सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी करत तिमारपूर येथील बस पार्किंगमधून चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांनाही अटक केली.
स्लीपर बस जप्त; फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
गुन्ह्यात वापरलेली विश्वनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीची UP83ET3789 या क्रमांकाची एसी स्लीपर बस पोलिसांनी जप्त केली आहे. दुरुस्तीनंतर मोकळी बस घेऊन तिमारपूरकडे जात असताना आरोपींनी परी चौक येथे मुलीला बसमध्ये घेतले होते. बसमधील चादरी, उशा आणि इतर ठिकाणांहून फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा केले जात असून न्यायालयासमोर कठोर कारवाई करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.