Crime News: बिहारमधील सहरसा शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे सहरसा जिल्हा सरचिटणीस अभिजित सिंह राजपूत यांना त्यांच्या राहत्या घरात शिरून अज्ञातांनी संपवलं. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, अवघ्या 22 वर्षांच्या या तरुण नेत्याच्या मृत्यूने राजकीय क्षेत्रात आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला. या दुर्दैवी घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून, परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
चेहऱ्यावर उशी ठेवून झाडली गोळी
पोलीस तपासातील प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली असावी. घटनेच्या काही वेळ आधीच अभिजित एका पार्टीवरून घरी परतले होते. गुन्हेगारांनी त्यांच्या घरात प्रवेश करून चेहऱ्यावर उशी ठेवली आणि अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना संपवलं. घटनेनंतर आरोपींनी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. गुरुवारी सकाळी अभिजित यांचा मित्र आर्यन घरी आला असता, कुलूप पाहून त्याला संशय आला. त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता अभिजित रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर त्याने तातडीने गावात राहणाऱ्या अभिजित यांच्या भावाला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा – Crime News: गर्भवती बहिणीला संपवणारा पती जामिनावर सुटला; मेहुण्याने रस्त्यातच केला गेम
संशयितांची चौकशी सुरू
या प्रकरणात प्राथमिक संशयाची सुई मित्रावर आणि काही ओळखीच्या व्यक्तींवर वळली असली, तरी पोलिसांनी अद्याप कोणालाही औपचारिकपणे अटक केलेली नाही. पोलीस डिजिटल पुरावे, फोन कॉल डिटेल्स (CDR) आणि आसपासच्या परिसरातील हालचालींचा कसून तपास करत आहेत. वैयक्तिक वैमनस्य, राजकीय स्पर्धा की अन्य काही कारणामुळे हा गुन्हा घडला, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान सहरसा पोलिसांसमोर आहे. ऐन तरुण वयात पक्षाच्या सक्रिय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी केली जात आहे.