Bengaluru IT Techie Kills Boy for Ransom: एका कार अपघाताच्या तपासादरम्यान एका 13 वर्षीय बालकाच्या क्रूर हत्येचा धक्कादायक कट उघड झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत एका मुलाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी भास्कर रेड्डी नावाच्या एका आयटी (IT) कर्मचाऱ्याला तात्काळ अटक केली आहे. येळहंका येथील विनायक नगरचा रहिवासी असलेल्या प्रज्वल नावाच्या या मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपीचा कट होता. आरोपी आणि पीडित कुटुंब गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून बंगळुरू येथे एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती.
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी रचला 1 कोटींच्या खंडणीचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भास्कर रेड्डीचे वडील सुमारे 3 कोटी रुपयांच्या प्रचंड कर्जात बुडाले होते. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी रेड्डीने प्रज्वलच्या अपहाराचा भयानक कट आखला. प्रज्वलचे वडील रिअल इस्टेट व्यवसायात असल्याने त्यांच्याकडून सहज 1 कोटी रुपयांची रक्कम उकळता येईल असा त्याचा अंदाज होता. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता प्रज्वलचे वडील घराबाहेर असताना आरोपी त्याच्या घरी गेला आणि गणेशोत्सवासाठी फटाके खरेदी करण्याचे तसेच कार चालवायला देण्याचे आमिष दाखवून त्याला सोबत चलण्यास सांगू लागला. प्रज्वलही आईला न सांगताच त्याच्यासोबत घराबाहेर पडला.
निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या
या गुन्ह्यात रेड्डीसोबत एका शाळेचा बस सफाई कामगारही सहभागी होता. दोघे आरोपी प्रज्वलला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्यांनी लाकडी दांड्याने मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूवर जोरदार प्रहार केले. तो बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी पोकळ सिमेंटच्या दोन विटांनी त्याच्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींचा तो आंध्र प्रदेशात घेऊन जाण्याचा बेत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
हेही वाचा – Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….
अपघातानंतर पोलिसी तपासात उघड झाला आरोपीचा बनाव
मृतदेह घेऊन आंध्र प्रदेशच्या दिशेने जात असताना प्रवासादरम्यान कार एका विजेच्या खांबाला धडकली, तरीही आरोपीने प्रवास सुरूच ठेवला. त्यानंतर चिक्काजाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावीर अपार्टमेंट्सजवळ कारने उभ्या असलेल्या इतर दोन वाहनांना जोरदार धडक दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता सुरुवातीला रेड्डीने मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून भीतीपोटी मृतदेह लपवत असल्याचे सांगितले. मात्र, उत्तर-पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त जी. के. मिथुन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चौकशीत त्याच्या जबाबात विसंगती आढळली आणि हत्येचे वास्तव समोर आले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल; फरार साथीदाराचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. अपघातानंतर रेड्डीचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा वेगाने शोध घेत आहेत. एका आयटी कर्मचाऱ्याने केवळ पैशांच्या हव्यासापोटी ओळखीच्या निष्पाप बालकाची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे संपूर्ण बंगळुरू शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – Crime News: गर्भवती बहिणीला संपवणारा पती जामिनावर सुटला; मेहुण्याने रस्त्यातच केला गेम