मुंबई : घरातून सकाळ-संध्याकाळी अनेक नागरिक कामानिमित्ताने मुंबईतील विविध भागांत जात असतात. घरातून बाहेर पडताना मनात असंख्य विचार असतात. मात्र, काहीवेळा घरगुती वाद-विवादाचा ताण हा काही व्यक्तीच्या मनावर राहतो आणि त्याचा परिणाम कामावरही होतो. नुकतीच मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका उबर चालकाने केलेल्या या कृत्याने टोल कर्मचारी आणि पोलिसांनाही हादरवून सोडलं होत.नेमकं काय घडलं?
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उबर टॅक्सी चालक गेल्या काही दिवसांपासून कुटुंबातील भांडण,मतभेद किंवा वादामुळे त्रस्त होता. याच मानसिक तणावातून त्याचे हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. चालक हा सी-लिंकवर पोहोचल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चालक सी-लिंकवरुन खाली उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे एका टोल कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्याने क्षणाचाही उशीर न करता तातडीने चालकाला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनाही सर्व माहिती देण्यात आली.काही टोल कर्मचारी आणि पोलिसांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे चालकाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सी-लिंकवरील सुरक्षेचा मु्द्दा चर्चेत आलेला आहे. वेळीच मदत मिळाल्याने उबर चालकाचा जीव वाचला. या घटनेनंतर पोलिसांकडून संबंधित चालकाची संपूर्ण चौकशी करण्यात येत असून, या आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण काय होते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.