Assam Youth Steals 50 Lakh for Girlfriend: प्रेयसीसोबत मौजमजा करण्यासाठी एका 25 वर्षीय तरुणाने स्वतःच्याच घरात चोरी करून तब्बल 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. यश धनुका अग्रवाल असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत होता. 11 ऑगस्ट रोजी घरातील सदस्य बाहेर गेले असताना, वडिलांनी व्यवसायासाठी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेली रक्कम आणि दागिने यशने चोरले व तो गायब झाला. आसामच्या जोरहाट जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना घडली.
सायबर सेलच्या मदतीने वडिलांनी अहमदाबाद गाठले; मुलाला आणून थेट..
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सायबर सुरक्षा पथकाच्या मदतीने यशचा मोबाईल अहमदाबादमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर जराही विलंब न लावता त्याच्या वडिलांनी स्वतः अहमदाबाद गाठले, यशला पकडून जोरहाटला परत आणले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले. जोरहाट सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश हजारिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या तक्रारीवरून यशला अटक करण्यात आली असून सध्या त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
प्रेयसीला दीड लाखांचा आयफोन आणि रिसॉर्टमध्ये मुक्काम; चोरीच्या पैशांची उधळपट्टी
पोलिसांच्या चौकशीदरम्यान यशने चोरी केलेल्या पैशांमधून प्रेयसीवर मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी केल्याचे कबूल केले. त्याने तिला सुमारे 1.5 लाख रुपयांचा महागडा आयफोन भेट दिला; तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही दिली. चोरीनंतर दोघांनी काही दिवस महागड्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये घालवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात प्रेयसीवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरी पोलीस तिचीदेखील चौकशी करणार आहेत.
दोन फरार मित्रांच्या मदतीने कट; विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या चोरीच्या कटात यशला मदत करणाऱ्या जितेंद्र सोमानी आणि रोहित प्रसाद या त्याच्या 2 मित्रांवरही एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. या दोघांनी चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यास यशला मदत केली असून ते दोघे सध्या फरार आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 61(2), 305(अ), 317(2), 3(5) आणि 56 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, चोरीला गेलेली रोकड व उर्वरित दागिने हस्तगत करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.