10th Class Student Ends Life: एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. मंगळवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मुलगी खाली कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
धक्कादायक वास्तव? तरुण पिढीचं तणावग्रस्त जीवन ठरतंय जीवघेणं
शनाया बिश्त असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तिच्या खोलीत एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत तिने 10 वीच्या अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण असल्याचे नमूद केले आहे. ही मुलगी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील गौर सिद्धार्थम सोसायटीत राहत होती. अभ्यासाच्या तणावातूनच तिने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत असले, तरी पोलीस या घटनेच्या सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर; विजयनगर पोलिसांकडून सोसायटीतील रहिवाशांची चौकशी
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मृत शनायाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर संपूर्ण गौर सिद्धार्थम सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती व हळहळ व्यक्त केली जात आहे. विजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धर्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणात तिच्या कुटुंबातील सदस्यांसह ओळखीच्या व्यक्तींकडेही चौकशी करत आहेत. तसेच सोसायटीतील प्रत्यक्षदर्शी आणि रहिवाशांचे जबाब नोंदवून आत्महत्येमागची इतर काही संभाव्य कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू
विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे शिक्षण क्षेत्रातील आणि पालकांमधील वाढत्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेशी संबंधित सर्व पुरावे ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक तपासणी व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे मुलांवरील अभ्यासाच्या मानसिक दबावाबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Pune Firing : पुण्यात नक्की चाललंय काय? पुन्हा तरुणांकडून गोळीबार; पोलिसांकडून 6 जणांना अटक