अलास्का : भारतीय उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांच्या सामानात आढळलेली पॉवर बँक ‘संशयास्पद’ वाटल्याने त्यांना अमेरिकेच्या विमानतळावर आठ तासांसाठी ताब्यात ठेवण्यात आले. भारतीय उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांनी याविषयी ट्विट केलं आहे. तसेच, त्यांनी ही ट्विटद्वारे ही माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
चतुर्वेदी यांनी म्हटलंय की, विमानतळ सुरक्षेला त्यांच्या सामानातील पॉवर बँक “संशयास्पद” वाटल्याने त्यांना अमेरिकेच्या विमानतळावर आठ तासांसाठी ताब्यात ठेवण्यात आले आणि एका पुरुष अधिकाऱ्याने त्यांना अंगावर घातलेले उबदार कपडे उतरवायला लावून त्यांची ‘शारीरिक तपासणी’ केली.
चतुर्वेदी यांनी X पोस्टमध्ये, अलास्कातील अँकरेज विमानतळावर त्यांना आलेल्या ‘सर्वात वाईट’ अनुभवाबद्दल खुलासा केला, जिथे त्यांचे उबदार कपडे काढून टाकण्यात आले, थंड वातावरण असलेल्या खोलीत त्यांना वाट पाहण्यास भाग पाडण्यात आले. पोलीस आणि एफबीआयने त्यांची चौकशी केली आणि त्यांना एकही फोन कॉल करू देणे नाकारले. त्यांना त्यांच्या हँडबॅगमधील पॉवर बँकविषयी विचारण्यात आले.
हेही वाचा – Tahawwur Rana : लँडिंगनंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आला समोर; आता फासावर लटकणार की तुरुंगात सडणार?
इंडिया अॅक्शन प्रोजेक्ट आणि चायपानीच्या संस्थापक चतुर्वेदी म्हणाल्या की, त्यांना शौचालय वापरण्याची परवानगीही नाकारण्यात आली आणि त्यांची फ्लाइट चुकवण्यात आली. त्यांचा मोबाईल फोन आणि पाकीटही त्यांच्याकडून घेण्यात आले. विमानतळावर त्यांच्या बॅगेतील पॉवर बँकवर संशय घेतल्यामुळे त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी वागणूक झाली. श्रुती चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे महिला अधिकाऱ्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पुरुष अधिकाऱ्यांकडून त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. थंडी असतानाही त्यांचे गरम कपडे काढून घेण्यात आले. त्यांना स्वतःचा फोन वापरण्याची किंवा पाकीट हातात ठेवण्याचीही परवानगी देण्यात आली नाही. श्रुती चतुर्वेदी यांनी त्यांना मिळालेल्या वागणुकीबद्दल तिने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली.
श्रुती चतुर्वेदी यांची पोस्ट
Imagine being detained by Police and FBI for 8 hours, being questioned the most ridiculous things, physically checked by a male officer on camera, stripped off warm wear, mobile phone, wallet, kept in chilled room, not allowed to use a restroom, or make a single phone call, made… — Shruti Chaturvedi ?? (@adhicutting) April 8, 2025
“कल्पना करा की, पोलीस आणि एफबीआयने 8 तासांसाठी ताब्यात घेतले, अत्यंत हास्यास्पद गोष्टींची चौकशी केली, कॅमेऱ्यासमोर एका पुरुष अधिकाऱ्याने शारीरिक तपासणी केली, गरम कपडे, मोबाईल फोन, पाकीट काढून टाकले, थंड खोलीत ठेवले, शौचालय वापरण्याची किंवा एकही फोन कॉल करण्याची परवानगी दिली नाही. फ्लाइट चुकवली – हे सर्व विमानतळ सुरक्षेला तुमच्या हँडबॅगमधील पॉवरबँक ‘संशयास्पद’ वाटल्यामुळे झाले,” असे त्यांनी एक्स वर लिहिले आहे. हा अनुभव त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाला टॅग केला आहे. चतुर्वेदी यांनी केवळ वर्णद्वेषातून ही कारवाई करण्यात आल्याचा अनुभव आला, असे म्हटले आहे.
श्रुती चतुर्वेदी यांचे प्रकरण राष्ट्रपती ट्रम्प यांच्या प्रशासन आणि धोरणात्मक बदलांमुळे अमेरिकेतील इमिग्रेशन धोरणे कशी अधिकाधिक कठोर झाली आहेत हे अधोरेखित करते. या वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, पर्यटक आणि व्हिसाधारकांना दीर्घकाळ ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे जर्मनी आणि कॅनडा सारख्या देशांनी अमेरिकेला त्यांच्या प्रवास सूचना अपडेट केल्या आहेत.
श्रुती चतुर्वेदी यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला टॅग करत सवाल केला आहे की, “भारतीय नागरिकांना परदेशात सन्मानाने वागणुकीचा अधिकार नाही का? माझ्यासोबत अशी वागणूक का करण्यात आली?” या प्रकरणावर अमेरिकन विमानतळ प्रशासन किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हेही वाचा – Auto नंतर आता ट्रम्प Pharma क्षेत्रावर कर लादणार! भारतीय औषध कंपन्यांच्या अडचणी वाढणार का? जाणून घ्या
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.