UAE Visa Services: संयुक्त अरब अमिरातीत (UAE) राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आणि तिथला प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यूएईमधील भारतीय पासपोर्ट, व्हिसा आणि कागदपत्रांच्या पडताळणीची सेवा येत्या 26 जून ते 30 जून या कालावधीत तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे. भारतीय दूतावासाच्या वतीने या सेवांचे काम आता एका नवीन बाह्य संस्थेकडे (आउटसोर्सिंग एजन्सी) सोपवले जाणार आहे. या प्रशासकीय बदलाच्या प्रक्रियेमुळे हे पाच दिवस नियमित कामकाज थांबवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती अबू धाबी येथील भारतीय दूतावासाने दिली आहे. त्यानुसार, 'अल हिंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स एलएलसी' ही संस्था 1 जुलै 2026 पासून संपूर्ण यूएईमध्ये या सेवांची धुरा सांभाळणार आहे.
सेवा हस्तांतरणाचे वेळापत्रक आणि आपत्कालीन पर्याय
सध्या या सेवांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'बीएलएस इंटरनॅशनल' (पासपोर्ट आणि व्हिसा) आणि 'एसजीआयव्हीएस ग्लोबल' (अटेस्टेशन) या कंपन्या 25 जून रोजी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर नवीन अर्ज स्वीकारणे पूर्णपणे बंद करतील. त्यामुळे 26 जून ते 30 जून दरम्यान कोणत्याही सामान्य अपॉइंटमेंट्स उपलब्ध नसतील. मात्र, या संक्रमण काळात भारतीय नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ 'आपत्कालीन' पासपोर्ट, व्हिसा आणि साक्षांकन सेवा भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमार्फत सुरू ठेवल्या जातील. तात्काळ मदतीची गरज असल्यास नागरिक 800 INDIA (800 46342) या टोल-फ्री क्रमांकावर, +971 54 309 0571 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलद्वारे थेट संपर्क साधू शकतात.
1 जुलैपासून नवीन पोर्टल
दरम्यान, नवा सेवा पुरवठादार 'अल हिंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स' 1 जुलैपासून कामाची सूत्रे हाती घेतानाच नागरिकांसाठी एक नवीन ऑनलाईन अपॉइंटमेंट पोर्टल देखील लाँच करणार आहे. भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ही नवी संस्था संयुक्त अरब अमिरातीच्या सातही अमिरातींमध्ये एकूण 16 कॉन्सुलर सर्व्हिस सेंटर्स चालवणार आहे, ज्यामुळे तिथल्या भारतीय समुदायाला या सर्व सेवा मिळवणे अधिक सुलभ आणि सोयीचे होणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलाच्या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी केवळ अबू धाबी आणि दुबई येथील भारतीय राजनैतिक कार्यालयांच्या अधिकृत वेबसाईट व सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.