Iran-US Ceasefire: इराण-अमेरिका युद्धाला पूर्णविराम? ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण ‘ही’ अट कायम

इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रदीर्घ तणावानंतर जागतिक राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा सशस्त्र संघर्ष आता अधिकृतपणे थांबल्याचे संकेत मिळाले आहेत.
Iran-US Ceasefire: इराण-अमेरिका युद्धाला पूर्णविराम? ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण ‘ही’ अट कायम

Iran-US Ceasefire: इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रदीर्घ तणावानंतर जागतिक राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा सशस्त्र संघर्ष आता अधिकृतपणे थांबल्याचे संकेत मिळाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने एका महत्त्वपूर्ण घोषणेद्वारे स्पष्ट केले आहे की, इराणसोबतचा लढा आता संपुष्टात आला आहे. अमेरिकेच्या ‘वॉर पॉवर्स रिझोल्यूशन’ (युद्ध अधिकार ठराव) अंतर्गत ही घोषणा करण्यात आली असून, इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या काँग्रेसच्या 60 दिवसांच्या अनिवार्य मंजुरीची मुदत संपण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी अद्याप ट्रम्प यांनी या युद्धबंदीवर कोणतही वक्तव्य केललं नाहीये. 

स्वसंरक्षणाची अट आणि नौदलाचा पेच
युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी, ट्रम्प प्रशासनाने यामध्ये एक विशिष्ट अट निश्चित केली आहे. या आदेशात नौदल नाकेबंदीचा (Naval Blockade) कोणताही स्पष्ट उल्लेख नसला तरी, प्रशासनाने बजावले आहे की, जर इराणने अमेरिकेच्या कोणत्याही नौदल जहाजावर किंवा मालमत्तेवर हल्ला केला, तर राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च सेनापती या नात्याने काँग्रेसच्या पूर्वपरवानगीशिवाय त्वरित बचावात्मक लष्करी कारवाईचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे हा युद्धविराम पूर्णपणे इराणच्या पुढील भूमिकेवर अवलंबून असेल.

FIFA विश्वचषक 2026: इराणच्या सहभागावर शिक्कामोर्तब
राजकीय तणावाच्या सावटाखाली असलेल्या आगामी फिफा (FIFA) विश्वचषकाबाबत फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी स्पर्धेत इराणच्या संघाच्या सहभागाला दुजोरा दिला आहे. या वर्षी 11 जूनपासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत इराणचा समावेश ‘गट G’ (Group G) मध्ये करण्यात आला आहे. इराणचे सामने लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंड आणि बेल्जियमविरुद्ध, तर सिएटलमध्ये इजिप्तविरुद्ध होतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फिफा प्रमुखांना आश्वासन दिले आहे की, इराणच्या खेळाडूंचे आणि संघाचे अमेरिकेत स्वागत केले जाईल.

हेही वाचा – Donald Trump Photo on American Passport : अमेरिकन पासपोर्टवर आता 'ट्रम्प' ब्रँडिंग! स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षपूर्तीनिमित्त सोनेरी स्वाक्षरीसह नवीन लूक

इस्रायलला लष्करी साहित्याचा पुरवठा सुरूच
एककीडे युद्धविरामाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अमेरिकेकडून इस्रायलला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा मात्र 'युद्धपातळीवर' सुरू आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेने इस्रायलला 6,500 टन शस्त्रे आणि लष्करी साहित्य पाठवले असून, दोन मालवाहू जहाजे अशदोद आणि हैफा बंदरांवर दाखल झाली आहेत. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण 1,15,600 टनांहून अधिक साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून, त्याचे सरासरी प्रमाण दररोज 2,000 टन इतके आहे. या पुरवठ्यामुळे आगामी काळात संभाव्य लष्करी मोहिमांसाठी इस्रायलला सज्ज केले जात असल्याचे दिसून येत आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version