Delhi Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात चकित करणारे खुलासे समोर आले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलच्या चौकशीत अबू उकासा (कोड नेम) या नावाचा उलगडा झाला असून, तोच या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड आणि हँडलर असल्याची माहिती समोर आली आहे.
तुर्कीचे दहशतवादी नेटवर्क उघड
स्फोट झालेल्या ह्युंदाई आय20 कारचा चालक मोहम्मद उकासा हा तुर्कीच्या अंकारा येथील अबू उकासाशी सतत संपर्कात होता. तपासात उघड झालं की अबू उकासा हा केवळ हँडलर नसून, जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर आणि मसूद अझहरचा नातेवाईक आहे. डॉ. मुझम्मिल शकील आणि उमर या दोघांनाही त्याने तुर्कीमध्ये ‘ब्रेनवॉश’ केल्याचे कबूल करण्यात आले आहे.
सुरक्षित अॅपद्वारे संवाद
सुरक्षा यंत्रणांकडून लक्ष वेधले जाऊ नये म्हणून सुरुवातीला हँडलरशी व्हॉट्सअॅपद्वारे संवाद होत होता. मात्र नंतर एजन्सींच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी “Sessions” नावाच्या एन्क्रिप्टेड अॅपचा वापर सुरू केला. या अॅपमधील चॅट्स ट्रेस करणे जवळजवळ अशक्य असल्याने दहशतवादी संघटना याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
तुर्की सरकारचे स्पष्टीकरण
या संपूर्ण कटात तुर्कीचे नाव पुढे आल्यानंतर तुर्की सरकारने भारतातील माध्यमांतील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या कम्युनिकेशन डायरेक्टरेटने निवेदन जारी करून म्हटले की, “तुर्की दहशतवादी संघटनांना कोणताही आर्थिक, लॉजिस्टिक किंवा राजनैतिक पाठिंबा देत नाही.”
हेही वाचा – Assam Police Action: दिल्ली स्फोटावर थट्टा केल्याप्रकरणी आसाममध्ये 15 जणांना अटक
मसूद अझहर गटाशी थेट संबंध
तपासात हेही स्पष्ट झाले की हे मॉड्यूल ‘उमर बिन खिताब’ आणि ‘फरजान दारुल उलूम’ या दोन टेलिग्राम गटांशी जोडलेले होते. हे दोन्ही गट जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय असून, त्यावर मसूद अझहरच्या भाषणांचे क्लिप्स, जिहादला चिथावणी देणारे संदेश आणि दहशतवादी प्रचार सामग्री सतत शेअर केली जात होती.
तीनही कार पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, या हल्ल्यात वापरलेल्या तिन्ही कार तपास यंत्रणांनी जप्त केल्या आहेत. तिसरी कार अल-फलाह विद्यापीठ परिसरातून हस्तगत करण्यात आली असून ती डॉ. शाहीन सईद यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्याआधी पोलिसांनी फरीदाबादमधील खंडावली गावातून लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त केली होती, जी डॉ. उमर नबी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. या सर्व घडामोडींमुळे दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा स्पष्ट दुवा उघड झाला आहे. तपास यंत्रणांनी अबू उकासा आणि त्याच्या तुर्की कनेक्शनचा शोध सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.