IND vs BAN: आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. 17 जानेवारी रोजी झिम्बाब्वेच्या बुलावायो मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही देशांमधील वाढती कटुता स्पष्टपणे दिसून आली. नाणेफेकीसाठी (Toss) मैदानात उतरलेल्या भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा प्रभारी कर्णधार जवाद अब्रार यांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून क्रिकेट जगतात यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
बीसीसीआय आणि बीसीबी मधील वाद टोकाला
भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील संबंध सध्या कमालीचे बिघडले आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) आदेशावरून आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून मुस्तफिजूर रहमानला वगळण्यात आल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. या घटनेचा निषेध म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आगामी टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. या राजनैतिक आणि क्रीडाविषयक तणावाचा सावली आता अंडर-19 विश्वचषकावरही पडल्याचे चित्र दिसत आहे.
मैदानावर काय घडले?
पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा नियमित कर्णधार मोहम्मद अझीझुल हकीम तमीम आजारपणामुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी जवाद अब्रारने नेतृत्व केले. नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन न करताच मैदानाबाहेर जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या आशिया चषकादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनीही अशाच प्रकारे हस्तांदोलन टाळले होते, ज्याची आता पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे.
हेही वाचा – WPL 2026: 'स्मृती'ब्रिगेडची विजयाची हॅट्ट्रिक; श्रेयांकाच्या फिरकीवर गुजरात जायंट्सचा 'क्लीन बोल्ड'
दोन्ही संघांची 'प्लेइंग इलेव्हन'
भारत अंडर-19: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हरवंश पंगालिया, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन.
बांगलादेश अंडर-19: रिफत बेग, जवाद अबरार (कर्णधार), कलाम सिद्दीक अलिन, मोहम्मद रिझान होसन, मोहम्मद फरीद हसन फैसल (यष्टीरक्षक), मोहम्मद समीयून बसीर रातुल, शेख पावेझ जिबोन, अल फहाद, साद होसैन, इक्बाल इक्बाल रजिन.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.