दिवाळीत केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काही राज्यांनीही इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यातील इंधनाचे दर कमी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्यावेळी पवारांनी केंद्राकडे बोट दाखवले होते. मात्र आता पवरांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही. परंतु केंद्राने ५ रुपये कर कमी केला की आपोआप ७ रुपये टॅक्स कमी होतो. आमचे म्हणणे असे आहे की, टॅक्स १०-१२ रुपये करा ना, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
शरद पवारांनी जीएसटीच्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार राज्यातील इंधन दरवाढीबाबत दिलासा देईल अशी ग्वाही पवारांनी दिली. तसेच केंद्र सरकारने जीएसटीचे देणे लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल, असा टोलाही शरद पवारांनी लगावला होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी यात बोलत असल्याची प्रतिक्रीय फडणवीसांनी दिली आहे.