Shubman Gill Health Update: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मालिका वाचवण्याच्या आशेने उतरणार असताना, कर्णधार शुभमन गिल अनपेक्षितपणे या सामन्यातून बाहेर झाला आहे.
कोलकाता कसोटीनंतर प्रकृती बिघडली
कोलकाता कसोटीदरम्यान शुभमन गिलच्या मानेस दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर ठरल्याने त्याला त्या सामन्यातून बाहेर पडावे लागले आणि वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर बीसीसीआय आणि स्थानिक डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात होते. मात्र, त्याची प्रकृती पूर्णपणे सुधारली नसल्याने बीसीसीआयने सावध भूमिका घेत गिलला गुवाहाटी कसोटीतून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Shikhar Dhawan Cheating Case: शिखर धवनच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहार; मॅनेजमेंट कंपनीच्या CEO वर गंभीर आरोप
गुवाहाटीतून अचानक मुंबईला रवाना
दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी शुभमन गिल संघासोबत गुवाहाटीत पोहोचला होता. पण 20 नोव्हेंबरच्या सराव सत्रात तो उपस्थित नसल्याने त्याच्या उपलब्धतेबाबत शंका निर्माण झाली. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार गिलला संघातून अधिकृतपणे रिलीझ करण्यात आले असून तो मुंबईला रवाना झाला आहे. मुंबईत तो दोन ते तीन दिवस विश्रांती घेणार असून त्यानंतर डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्याशी विशेष सल्लामसलत करणार आहे. आवश्यकता भासल्यास तो पुढील उपचारांसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही जाण्याची शक्यता आहे.
गिलच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी ऋषभ पंतकडे
गिल बाहेर झाल्याने गुवाहाटी कसोटीत संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. मागील सामन्यातही गिल दुखापतीमुळे बाहेर पडल्यावर पंतने संघाची धुरा सांभाळली होती, मात्र भारताला पराभव पत्करावा लागला होता. तथापी, गिलच्या जागी साई सुदर्शन किंवा नितीश कुमार रेड्डी यापैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.