Rohit Sharma T20 Comeback: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटच्या मैदानात उतरू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो पुन्हा या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असल्याचे रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रोहितच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित सध्या फिटनेसला प्राधान्य देत आहे. वजनात मोठी घट आणि कडक ट्रेनिंगद्वारे त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोहितने आपली फिटनेस स्थिती दाखवण्यासाठी देशांतर्गत दोन मोठ्या स्पर्धांमध्ये विजय हजारे ट्रॉफी (वनडे) आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवली आहे. एनडीटीव्हीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, याबाबतचा संदेश स्वतः रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला पाठवला आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेनंतर तो मुंबईकडून मैदानात उतरताना दिसू शकतो. सध्या देशात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा सुरु आहे, तर विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात 24 डिसेंबरला होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये रोहित खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित आणि विराट कोहलीला विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचा सल्ला बीसीसीआयने दिल्यानंतर रोहितने केवळ वनडेच नव्हे, तर टी-20 स्पर्धेलाही स्वतःला उपलब्ध ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधून निवृत्ती घेतली होती. मात्र शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सक्रिय राहण्यासाठी तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सहभागी होण्यास तयार असल्याचे बोर्डातील सूत्रांनी सांगितले. टी-20 स्वरूपातील ही स्पर्धा लिस्ट-ए वर्गात मोडत असल्याने, निवृत्ती घेतलेल्या खेळाडूने खेळण्याचा हा दुर्मिळ निर्णय मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.