अहमदाबाद: “क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे” हे वाक्य अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले. सामन्याच्या अंतिम टप्प्यात विजयासाठी अवघ्या 12 चेंडूत 15 धावांची गरज… क्रीझवर गुजरातचे भक्कम फलंदाज आणि स्टेडियमवर चाहत्यांच्या विजयाचा जल्लोष सुरू होण्याची तयारी, असे सर्व चित्र असताना राजस्थान रॉयल्सने अनपेक्षित धक्का दिला.
क्रिकेटमध्ये ‘शेवटचा चेंडू पडेपर्यंत काहीही सांगता येत नाही’ याची प्रचिती देत, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत राजस्थानने गुजरात टायटन्सवर सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि आयपीएलच्या रणसंग्रामात आणखी एका थरारक सामन्याची नोंद केली.
The defining moment ? ? @rajasthanroyals clinch a #TATAIPL classic by 6⃣ runs to jump to the ? of the points table ? Scorecard ▶️ https://t.co/6D02Fh0IHv#KhelBindaas | #GTvRR pic.twitter.com/XGjFMb7bHy — IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. युवा वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 6.2 षटकांत 70 धावांची स्फोटक भागीदारी रचली. वैभव 18 चेंडूत 30 धावा करून रशीद खानची शिकार ठरला, तर जैस्वालने 36 चेंडूत 55 धावांची (6 चौकार, 3 षटकार) शानदार अर्धशतकी खेळी केली. कर्णधार रियान पराग (8) स्वस्तात माघारी परतला असला, तरी त्यानंतर मैदानावर ध्रुव जुरेल नावाचे वादळ घोंघावले. जुरेलने 42 चेंडूत 5 चौकार आणि 5 गगनभेदी षटकारांची आतषबाजी करत 75 धावांची वादळी खेळी साकारली. त्याला शिमरॉन हेटमायर (18) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 7) यांची साथ मिळाली, ज्यामुळे राजस्थानला 220 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून कागिसो रबाडाने 2, तर मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात काहीशी अडखळत झाली. मात्र, सलामीवीर साई सुदर्शनने एकाकी झुंज देत संघाचा डाव सावरला. सुदर्शनने राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 44 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 73 धावांची अप्रतिम खेळी साकारली. जोस बटलर (26) आणि कुमार कुशाग्र (18) यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. मध्यफळीत राहुल तेवतिया (12), शाहरुख खान (11) आणि स्वतः कर्णधार रशीद खान (24) यांनी फटकेबाजी करून विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या, परंतु राजस्थानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
? Roaring and leaping to victory ✨ RELIVE Tushar Deshpande's match-winning final over ▶️https://t.co/UEPT1UYIwD#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/Pdg7HYkd40 — IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
गुजरातचे फलंदाज एका बाजूने धावांचा पाठलाग करत असताना, दुसऱ्या बाजूने राजस्थानचा फिरकीपटू रवी बिश्नोईने त्याच्या फिरकीची जादू दाखवली. बिश्नोईने गुजरातच्या फलंदाजांना तालावर नाचवत 4 षटकांत 41 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी टिपले आणि सामन्याचे पारडे राजस्थानच्या बाजूने झुकवले. त्याला नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे आणि कर्णधार रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी घेत मोलाची साथ दिली. अनुभवी जोफ्रा आर्चरला विकेट मिळाली नसली, तरी त्याने अतिशय भेदक मारा करत चार षटकांत केवळ 38 धावा दिल्या आणि धावांना मोठा आळा घातला.
सामन्याचा खरा थरार मात्र शेवटच्या काही षटकांत लपला होता. गुजरातला विजयासाठी 12 चेंडूत 15 धावा आणि नंतर शेवटच्या 6 चेंडूत केवळ 11 धावांची गरज होती. कागिसो रबाडा (नाबाद 23) सारखा फलंदाज क्रीझवर असल्याने गुजरातचा विजय निश्चित मानला जात होता. पण येथेच ‘तुषार देशपांडे’ नावाच्या अस्त्रानं कहर केला. संपूर्ण स्टेडियमचा दबाव झुगारून अतिशय अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी करत तुषारने शेवटच्या षटकात अवघ्या 4 धावा खर्च केल्या. गुजरातच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवत त्याने राजस्थानच्या अविश्वसनीय विजयावर शिक्कामोर्तब केले. खऱ्या अर्थाने हा विजय म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या कधीही हार न मानणाऱ्या जिद्दीचा विजय ठरला!