Sim Card Misuse: देशातील मोबाइल वापरकर्त्यांसाठी सरकारने मोठा इशारा देत सिम कार्डच्या गैरवापरावर कडक पाऊले उचलण्याची घोषणा केली आहे. सिमचा चुकीच्या पद्धतीने वापर, सायबर फसवणूक, तसेच बदललेले IMEI असलेले मोबाइल वापरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार असून दोषींना 50 लाखांपर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
सिमचा गैरवापर झाल्यास ग्राहकही जबाबदार
दूरसंचार विभागाने जाहीर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम मिळवणे, सिम कार्ड इतरांना देणे, सायबर गुन्ह्यासाठी सिमचा वापर करणे, छेडछाड केलेल्या IMEI असलेला मोबाईल वापरणे, ही सर्व कृत्ये गंभीर गुन्हे मानले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीच्या नावावर सिम आहे, त्या ग्राहकाला देखील गैरवापरासाठी जबाबदार धरले जाईल.
हेही वाचा – Charlotte Robot: काय सांगता! अवघ्या 24 तासांत तयार होणार पूर्ण घर; नेमका काय आहे हा ‘शार्लोट’ रोबोट?
दूरसंचार विभागाने ग्राहकांना कॉलिंग लाईन आयडेंटिटी (CLI) किंवा इतर ओळख बदलणारे अॅप्स आणि वेबसाइट वापरू नयेत असा सल्ला देखील दिला आहे. निवेदनानुसार, दूरसंचार कायदा, 2023 अंतर्गत, IMEI आणि मोबाईल वापरकर्त्यांची ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर पद्धतींमध्ये छेडछाड केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
हेही वाचा – AI ने शोधला TB ला रोखण्याचा नवा मार्ग! CAD4TB+ प्लॅटफॉर्ममुळे मृत्यूदर कमी होणार; जाणून घ्या हे कसे काम करते
अशा प्रकारे करा IMEI नंबरची पडताळणी
दूरसंचार (सायबर सुरक्षा) नियम 2024 नुसार, कोणत्याही व्यक्तीला IMEI मध्ये बदल करण्यास किंवा IMEI नंबर बदलता येईल अशी उपकरणे वापरण्यास, उत्पादन करण्यास किंवा बाळगण्यास मनाई करते. दूरसंचार विभागाने 'संचार साथी' पोर्टल किंवा अॅपद्वारे मोबाइल उपकरणांच्या IMEI नंबरची पडताळणी करण्याचा सल्ला दिला आहे. तथापी, सरकारचे स्पष्ट मत आहे की देशातील दूरसंचार नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे आणि सिमचा गैरवापर रोखण्यासाठी आता नियम आणखी कडक केले जात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.