Bhogi 2026 : मकर संक्रांतीच्या बरोबर एक दिवस आधी, म्हणजेच 13 जानेवारी 2026, मंगळवारी 'भोगी' हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जाणार आहे. 'भोगी' या शब्दाचा अर्थ आहे 'उपभोग घेणे' किंवा 'आनंद साजरा करणे'. हा सण प्रामुख्याने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि हिवाळ्यातील ताज्या पिकांचा आनंद घेण्याचा दिवस आहे. यादिवशी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा असून, स्नानाच्या पाण्यात उष्णतेचे प्रतीक असलेले तीळ आवर्जून टाकले जातात, जेणेकरून थंडीचा कडाका बाधू नये.
सुगड पूजन: सुख-समृद्धीचे प्रतीक
भोगीच्या दिवशी सुवासिनी महिला 'सुगड' पूजन करतात. सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी, जी निसर्गाशी आपले नाते जोडतात. पूजेसाठी 5 सुगड घेऊन त्यांना हळद-कुंकवाचे लेपन केले जाते. या सुगडांमध्ये शेतातील नवीन बहरलेल्या वस्तू जसे की ऊस, हरभरा, गाजर, बोरे, शेंगा, तीळ आणि तिळगूळ भरले जातात. हे सुगड देवासमोर मांडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. असे मानले जाते की, सुगड पूजनामुळे कुटुंबात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि संसाराला भरभराट येते.
पौष्टिक मिश्र भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी
भोगीच्या जेवणाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'खेंगट' किंवा 'मिश्र भाजी'. हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्या जसे की वांगी, घेवडा, वाटाणा, पावटा, हरभरा आणि शेंगदाणे एकत्र करून ही चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा हे समीकरण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. बाजरी आणि तीळ या दोन्ही पदार्थांमध्ये उष्णता असते, जी थंडीच्या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. याशिवाय, या दिवशी राळ्याच्या भात केला जातो.
इंद्रदेव आणि निसर्गाची कृतज्ञता
पौराणिक मान्यतेनुसार, भोगी हा सण पर्जन्यदेव इंद्रदेवाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. इंद्रदेवाने पृथ्वीवर मुबलक पाऊस पाडून पिके बहरावीत यासाठी प्रार्थना केली होती, म्हणून शेतकरी वर्ग या दिवशी त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात याला भोगी म्हणतात, तर पंजाबमध्ये 'लोहरी', तामिळनाडूमध्ये 'पोंगल' आणि आसाममध्ये 'भोगली बिहू' अशा विविध नावांनी हा कापणीचा उत्सव साजरा होतो. हा दिवस जुन्या, नकारात्मक विचारांचा त्याग करून नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात करण्याचा संदेश देतो.
कचरा टाळा आणि नकारात्मकता जाळा
भोगीच्या दिवशी घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. काही ठिकाणी पहाटे घराबाहेर जुने, निरुपयोगी सामान एकत्र करून 'भोगीची शेकोटी' पेटवली जाते. याचा आध्यात्मिक अर्थ असा की, मनातील वाईट सवयी, आळस आणि नकारात्मक विचार या अग्नीत भस्म करून आयुष्याची नवी सुरुवात करावी. मात्र, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक किंवा हानिकारक वस्तू जाळणे टाळावे, असे आवाहन सध्या केले जाते. 14 जानेवारीला होणाऱ्या मकर संक्रांतीच्या महाउत्सवासाठी भोगी हा दिवस उत्साहाची आणि सात्विक जेवणाची पर्वणीच ठरतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.