Prithviraj Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांवरून एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या व्यापार शुल्काच्या पार्श्वभूमीवर बोलताना चव्हाण यांनी विचारलेला एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरत आहे.
नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महत्त्वाच्या बाबींवर भारताला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. याच मुद्द्याला पुढे नेत चव्हाण यांनी व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा संदर्भ दिला, ज्यामध्ये निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती. 'व्हेनेझुएलातील घटना भारतातही घडेल का? ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का?' असा धक्कादायक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानाला अनेकांनी 'हास्यास्पद' आणि 'मूर्खपणाचे' लक्षण म्हटले आहे.
माजी पोलीस अधिकाऱ्याची टीका
चव्हाण यांच्या या विधानावर जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी हे विधान संपूर्ण देशासाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले. भारतासारख्या अण्वस्त्रधारी राष्ट्राच्या संदर्भात अशी विधाने करणे हे चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मत सोशल मीडियावरून व्यक्त होत आहे.
व्यापार युद्धावरून मोदी सरकारवर हल्ला
चव्हाण यांनी केवळ वैयक्तिक टीकाच केली नाही, तर भारत-अमेरिका व्यापारावरही भाष्य केले. ते म्हणाले की, 50 टक्के शुल्क आकारून व्यापार करणे शक्य नाही, हे एकप्रकारे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात रोखण्यासारखेच आहे. थेट निर्बंध लावता येत नसल्याने शुल्काचा हत्यार म्हणून वापर केला जात असून, याचे गंभीर परिणाम भारताला आणि भारतीय निर्यातदारांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.