न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी थेट मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत आंदोलन केले तर शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पवारांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या घरी पोहोचले आहेत. तर एसटी आंदोलनावर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट केले की, आंदोलनकर्त्यांनी एखाद्या नेतृत्वाच्या घरावर दगड आणि चपला फेकणे हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून मी याचा निषेध करतो. पवार साहेब हे सुरुवातीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आग्रही होते. अनेकवेळा राज्य शासनाला बैठका घ्यायला लावून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करायला लावल्या. किंबहुना काल उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्या निकालाचे स्वागत करत पेढे वाटले होते, असे असताना आज घडलेली घटना संशय निर्माण करणारी आहे.
आंदोलनकर्त्यांनी एखाद्या नेतृत्वाच्या घरावर दगड आणि चपला फेकणे हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून याचा मी तीव्र निषेध करतो. आदरणीय @PawarSpeaks साहेब हे सुरुवातीपासून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आग्रही होते. (1/3) — Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 8, 2022
तसेच, काहींनी चिथावणीखोर वक्तव्ये करत एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून पुन्हा एकदा राजकीय डाव साधत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना देखील माझी विनंती आहे, अशा राजकारणाला बळी पडून आपले आंदोलन बदनाम होईल असे कृत्य करू नका.