मोठी बातमी! विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मोठी कारवाई; ठाकरे गटाला मोठा धक्का

विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांचं नगरसेवकपदही रद्द झालं आहे. निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची भूमिका राऊत यांनी घेतली असून पुढील प्रक्रियेकडे लक्ष आहे.

मोठी बातमी! विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मोठी कारवाई; ठाकरे गटाला मोठा धक्का

मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजकारणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचं नगरसेवकपदही रद्द झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता. आता राऊत यांचं पद रद्द झाल्याने त्यांच्या जागेवर पुढे काय प्रक्रिया होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विशाखा राऊत यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीदरम्यान त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. समितीसमोर त्यांनी जुन्या नोंदी, वंशावळीशी संबंधित कागदपत्रे आणि कुटुंबातील पूर्वजांच्या काळातील पुरावे सादर केल्याचं सांगितलं. मात्र, काही कुणबी जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी त्यांचा रक्तसंबंध पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाला नसल्याचं समितीच्या आदेशात नमूद करण्यात आलं.

या निर्णयावर विशाखा राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे आजोबा आणि पणजोबांच्या काळापासूनचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. 1911 आणि 1927 सालच्या नोंदी तसेच मोडी लिपीतील कागदपत्रे आपण सादर केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच, या निर्णयामागे दबाव असल्याचा आरोप करत राऊत यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पालघरच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या प्रिया सरवणकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला पुढील संधी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

या निर्णयामुळे ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसला असून, विशाखा राऊत पुढील कायदेशीर पाऊल काय उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number