Uddhav Thackeray in Dasara Melava 2025 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले. “आज आपला दसरा मेळावा होत आहे. अजून दोन-तीन दसरा मेळावे झाले. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, पण विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो दसरा मेळावा झाला, त्याबाबत मी जरूर बोलणार आहे,” असे उद्धव ते म्हणाले. पुढे बोलताना, “100 वर्षे ही काही थोडी थोडकी वर्षे नाहीत. आज काय योगायोग आहे, काही कल्पना नाही. पण संघाची 100 वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जनसुरक्षा कायद्यावर सडकून टीका
जनसुरक्षा कायदा हा ‘हम करे सो कायदा’ असा आहे. तो तोडून-मोडून टाकला पाहिजे. जोपर्यंत मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते. पण त्यांच्यावर आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानात जाऊन आलात. एका शिष्टमंडळासोबत ते पाकिस्तानला गेले होते, म्हणून ते देशद्रोही ठरत असतील आणि अटक होणार असेल, तर नवाझ शरिफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचे, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही देशभक्त आणि देशद्रोही या दोघांनाच ओळखतो
उद्धवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका केली. ते म्हणाले, “लढणारी माणसे आता कमी होत चालली आहेत. जो लढेल, तो तुरुंगात जाईल, अशी सरकारची नीती झालेली आहे.” त्यांनी जनसुरक्षा कायद्याचा (जनसुरक्षा कायदा) उल्लेख करत या कायद्याला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल की, जनसुरक्षा कायदा आणला गेला. त्याला आपणही विरोध केला आणि तो लागू होता कामा नये.’ मुख्यमंत्री आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांनी त्यांची मखलाशी केली. कायद्याचा गैरवापर केला, असा आरोप केला. ठाकरे म्हणाले, “आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही. आम्ही देशभक्त आणि देशद्रोही या दोनच गोष्टी ओळखतो.” तोंडदेखली कारणे देण्याऐवजी, कायद्याचा गैरवापर कसा होतो हे उदाहरणासह दाखवून देतो, असे सांगत त्यांनी सोनम वांगचूक यांच्या प्रकरणाचा दाखला दिला.
सोनम वांगचूक यांनी न्याय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले
उद्धव टाकरे म्हणाले, सोनम वांगचूक चांगला देशभक्त माणूस आहे. या माणसाने लेह-लडाख यासारख्या अतिशय दुर्गम भागात अतिशय कडाक्याच्या थंडीपासून आपल्या सैनिकांचा बचाव व्हावा म्हणून सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा उभी करून छावण्या बांधून दिल्या. पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हाडं गोठवणाऱ्या थंडीत पाण्याची टंचाई होऊ नये, पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी आइस स्तुपची योजना आणली. अगदी काल परवापर्यंत वांगचुक मोदींची स्तुती करत होते. तोपर्यंत ते देशभक्त होते.
पण सोनम वांगचूक यांनी न्याय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्याबरोबर ते देशद्रोही कसे झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. लेह-लडाखला न्याय्य हक्क मिळायलाच हवा. न्याय्य हक्क ही लोकशाहीतील मूलभूत गरज आहे. उपोषण सुरू ठेवले होते. पण सरकार ढूंकून पाहायला तयार नाही. मग सगळे GenZपेटले. जसे नेपाळमध्ये पेटले, तसेच, लेह-लडाखमध्ये GenZ रस्त्यावर आले. मोदीबाबांनी त्यांना सरळ उचलून तुरुंगात टाकले. हा जनसुरक्षा कायदा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.