Uddhav Thackeray Issued Whip : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी बातमी समोर येत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 लोकसभा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. या संभाव्य मोठ्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने सावध पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाची 18 जून रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश म्हणजेच 'व्हिप' जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत 6 खासदारांची रणनीती; पक्षांतर बंदी कायदा टाळण्याचा प्लॅन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे 6 खासदार आधीच दिल्लीमध्ये दाखल झाले असून, ते स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या दाव्यानुसार, या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट संसदेत घेण्याचे नियोजन केले आहे. ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, कारवाई टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच 6 खासदारांची आवश्यकता असते. त्यामुळे जर हे 6 खासदार एकत्र बाहेर पडले, तर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, अशी कायदेशीर रणनीती आखली गेल्याचे समजते.
पक्षाशी प्रामाणिक राहणार; खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि अनिल देसाईंचे स्पष्टीकरण
या सर्व राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 14 जून रोजी झालेल्या बैठकीत सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. मात्र, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये फिरणाऱ्या बातम्या पाहता आपल्याला सावध राहावे लागेल. दरम्यान, या संपूर्ण वादात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, 'माझ्याशी शिंदे गटातील कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि पुढेही राहीन'.
'अपना सपना मनी मनी!'; संजय राऊतांचा 50 कोटींचा खळबळजनक आरोप
दुसऱ्या बाजूला, खासदार फोडण्यासाठी विरोधी गोटाकडून तब्बल 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, 'अपना सपना मनी मनी! प्रत्येक खासदारासाठी किमान समर्थन मूल्य 50 कोटी रुपये ठरवण्यात आले असून, त्यापैकी 15 कोटी रुपये तर अॅडव्हान्स म्हणून दिले जात आहेत'. तसेच, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस (TMC) सारख्या ब्रँडमुळेच या लोकांची किंमत वाढली आहे, अन्यथा यांची लायकी 50 हजार रुपयांचीही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकशाहीचा बाजार मांडलाय; खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनीही या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत विरोधी पक्षांवर तोफ डागली आहे. देशात लोकशाहीचा पुरता बाजार मांडला गेला असून, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले असल्याचे सावंत यांनी सांगितले. तसेच, 'पक्ष हा शेवटी पक्षच असतो; काही खासदार किंवा आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे,' असे म्हणत त्यांनी बंडखोरांना सुनावले आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक आता दिल्लीच्या दरबारात रंगण्याची चिन्हे असून, 18 जून रोजी होणाऱ्या घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.