Sanjay Raut PC : ‘आता पक्ष फोडूनच दाखवा,’ राऊतांचा थेट इशारा; खासदार फुटण्याच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

बंडखोर लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी आता केवळ कायदेशीर लढाई न लढता थेट जनमानसात जाऊन संघर्ष केला जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.
Sanjay Raut PC : ‘आता पक्ष फोडूनच दाखवा,’ राऊतांचा थेट इशारा; खासदार फुटण्याच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Maharashtra Political Crisis : नवी दिल्लीतील एका विशेष पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत व अरविंद सावंत यांनी पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक भूमिका मांडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा नवा कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) ठरवण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बंडखोर लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी आता केवळ कायदेशीर लढाई न लढता थेट जनमानसात जाऊन संघर्ष केला जाईल, असा थेट इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

बाळासाहेबांच्या ‘त्या’ शिकवणीची आठवण आणि आक्रमक इशारा
पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका करताना अरविंद सावंत यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या विचाराची आठवण करून दिली. सावंत म्हणाले की, जर भविष्यात पक्षाचा कोणताही आमदार किंवा खासदार पैशांच्या आमिषाला बळी पडून फुटला, तर त्याला रस्त्यावर गाठून धडा शिकवा आणि कायदेशीर परिणामांची अजिबात पर्वा करू नका, अशी बाळासाहेबांची स्पष्ट शिकवण होती. पत्रकार परिषदेचा शेवट करताना संजय राऊत यांनीही याच आक्रमक भाषेचा पुनरुच्चार केला, ज्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राऊत म्हणाले, ‘संसदेतील आमच्या पक्षाच्या कार्यालयात 11 वाजता बैठक होणार आहे. तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा,तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – Shivsena Opration Tiger : एकीकडे ठाकरेंची मनधरणीची रणनीती, तर दुसरीकडे शिंदेंचा 6 खासदारांना कॉन्फरन्स कॉल; 30 मिनिटांच्या चर्चेत काय झालं?

संसदेतील कार्यालयात तातडीची बैठक आणि ‘व्हीप’ जारी
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सर्व खासदारांसाठी एक महत्त्वपूर्ण ‘व्हीप’ (पक्षादेश) जारी केला आहे. हा आदेश सर्व खासदारांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर, व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे आधीच पाठवण्यात आला आहे. संसदेतील पक्ष कार्यालयात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला हजर राहणे सर्वांसाठी बंधनकारक असेल. सध्या केवळ 9 खासदार सोबत असल्याच्या चर्चा असल्या, तरी प्रत्यक्षात 15 खासदार बैठकीला उपस्थित राहतील, असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला.

बंडखोरांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या जाहीर सभा
पक्षफुटीच्या या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येऊन रणनीती आखली आहे. जो खासदार किंवा आमदार गद्दारी करेल, त्याच्या मतदारसंघात जाऊन थेट ‘राडा’ केला जाईल आणि त्यांना महाराष्ट्रात कुठेही मोकळीक दिली जाणार नाही. या मोहिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस देखील पूर्ण ताकदीने उतरणार आहे. स्वतः शरद पवार यांनी अशा बंडखोरांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेण्याची तयारी दर्शवली असल्याचे संजय राऊत यांनी आवर्जून सांगितले.

पक्षाशी एकनिष्ठ असलेले आणि शिंदे गटाच्या वाटेवर असलेले संभाव्य खासदार
सध्या सुरू असलेल्या या राजकीय वादात ठाकरे सेनेच्या 6 खासदारांची नावे चर्चेत आहेत. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील हे सहा जण शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तर, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे हे ठाकरेंसोबत असलेले एकनिष्ठ असल्याचे सांगण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version