KDMC Election 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच मोठे यश संपादन केले आहे. 122 जागांसाठी होणाऱ्या या लढतीत भाजपने दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. पक्षाच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
कोठे आणि कशी झाली बिनविरोध निवड?
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात एकाही प्रतिस्पर्ध्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक अधिकृतरीत्या होण्यापूर्वीच त्यांचा विजय सुकर झाला.
रेखा राजन चौधरी (प्रभाग 18 अ): 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' या राखीव जागेवरून त्यांनी अर्ज भरला होता. निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रभागात केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज आला. त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
आसावरी केदार नवरे (प्रभाग 26 क): खुल्या प्रवर्गातून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांच्या विरोधातही एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
'हिंदुत्वाचा विजय'; भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण
रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून भाजप महिला मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या या बिनविरोध निवडीला भाजपने 'हिंदुत्वाचा पहिला विजय' म्हणून संबोधले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष रणनीतीचे आणि प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे.
राज्याचं लक्ष 29 महापालिकांकडे
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि लातूरमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी ओढाताण आणि राजकीय नाट्य पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.