Mumbai Local: मध्य रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल पुन्हा एकदा एका विचित्र कारणाने चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) सुटलेली कल्याण एसी लोकल मंगळवारी भांडुप स्थानकाचा नियोजित थांबा ओलांडून पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. मोटरमनच्या विसरभोळेपणामुळे किंवा वेगाचा अंदाज न आल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक चर्चा रेल्वे वर्तुळात रंगली आहे. ऐन गर्दीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमका प्रकार काय घडला?
सकाळी 8:56 वाजता CSMT हून सुटलेली कल्याण जलद एसी लोकल घाटकोपर स्थानक सोडून भांडुपच्या दिशेने निघाली होती. नियमानुसार या लोकलचा पुढील थांबा भांडुप होता, मात्र स्थानकात प्रवेश करताना गाडीचा वेग कमी होण्याऐवजी ती वेगातच पुढे गेली. मोटरमनच्या ही बाब लक्षात येईपर्यंत लोकलचे दोन डबे फलाटाचा निश्चित थांबा ओलांडून पुढे निघून गेले होते. यामुळे डब्यातील प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले आणि मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
प्रवाशांचा संताप आणि रेल्वेचा पवित्रा
गाडी फलाटाच्या पुढे उभी राहिल्याने दरवाजातून थेट उतरणे प्रवाशांसाठी धोकादायक होते. अखेर प्रवाशांनी गाडीच्या आतील बाजूने दुसऱ्या डब्यात जाऊन फलाटावर उड्या मारल्या. सुदैवाने, या प्रवासात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, भांडुपसारख्या महत्त्वाच्या थांब्यावर असा प्रकार घडल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित मोटरमनकडून स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मध्य आणि हार्बर मार्गावरील एसी लोकल प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दररोजचा विलंब, अचानक रद्द होणाऱ्या फेऱ्या आणि दरवाजे उघडण्या-मिटण्यातील तांत्रिक अडचणींमुळे पासधारक प्रवासी त्रस्त आहेत. आता थेट स्टेशन विसरण्याचे प्रकार समोर आल्याने रेल्वेच्या प्रवासी सुरक्षिततेवर आणि तांत्रिक सक्षमतेवर प्रवाशांनी समाजमाध्यमांतून ताशेरे ओढले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.