अंतरवाली सराटी-जालना : मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज, सोमवारी तिसरा दिवस आहे. सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची जरागें पाटलांची भूमिका त्यांनी अनेकदा स्पष्ट केली आहे. दरम्यान, आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या आहेत. आज दुपारपर्यंत शिष्टमंडळ तोडगा काढण्यासाठी भेट घेणार असल्याचे समजते. न्या. संदीप शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे 58 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे आज हे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेत की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.