Ajit Pawar Helicopter Technical Snag: बारामतीतील भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने 12 वर्षांपूर्वीच्या एका अशाच थरारक प्रसंगाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी नियतीने साथ दिली होती आणि एका मोठ्या संकटातून अजितदादा थोडक्यात बचावले होते.
आकाशात मृत्यूचा थरार: हेलिकॉप्टरमधील 'तो' तांत्रिक बिघाड
ही घटना 5 एप्रिल 2014 ची आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी बुलढाणा दौऱ्यावर होते. दुसऱ्या दिवशी, 6 एप्रिलला सकाळी 10:50 च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर अमरावतीकडे जाण्यासाठी 'सहकार विद्या मंदिर'च्या मैदानातून हवेत झेपावले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आकाशात तांत्रिक बिघाड झाल्याने मृत्यूचा थरार सुरू झाला.
वैमानिकाची समयसूचकता आणि सुरक्षित लँडिंग
हेलिकॉप्टर हवेत असतानाच पायलटने गिअर बॉक्समध्ये गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे ओळखले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, क्षणाचाही विलंब न लावता पायलटने अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर पुन्हा बुलढाण्यातील हेलिपॅडच्या दिशेने वळवले. सकाळी 10:58 मिनिटांनी, म्हणजेच अवघ्या 8 मिनिटांच्या थरारानंतर हेलिकॉप्टर सुरक्षित जमिनीवर उतरले. हेलिकॉप्टरमधून सुरक्षित बाहेर येताच कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला, मात्र त्या 8 मिनिटांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
संकट टळले, पण जिद्द कायम
त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे मोठा अनर्थ टळला होता. विशेष म्हणजे, अशा जीवघेण्या संकटानंतरही अजित पवार डगमगले नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी पुढील विमान प्रवास रद्द केला आणि ते तातडीने कारने अमरावतीतील सभेसाठी मार्गस्थ झाले. संकटातही डगमगून न जाता कामाप्रती असलेली त्यांची हीच जिद्द आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
नियतीचा क्रूर खेळ
आज बारामतीतील अपघाताने 12 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. त्यावेळी वैमानिकाच्या सतर्कतेने 'दादा' वाचले होते, पण आजच्या घटनेत मात्र नियतीने साथ दिली नाही, अशीच आर्त भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.