अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनानंतर एकीकडे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना दुसरीकडे पवार कुटुंबातली दरी अधिकच वाढली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दादांच्या अपघात प्रकरणात चौकशीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील वाद उफाळून आल्याचे दृष्य आहे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणात चौकशीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून सतत प्रश्न विचारले जातात, तसेच अधिक चौकशीचा विषय मांडला जातोय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचे राजकारण करू नये अशा शब्दांत खडसावले आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी या विषयावर इथून पुढे बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील एक महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेला मोदींचा फोटो हटवल्या प्रकरणी अमित ठाकरेंवर एफआयआर दाखल करण्यात आली. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होत की, "माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या भावाचा अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे, अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही." अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 'यावेळी दादांच्या आई, मुलं आणि माझ्या एवढं मोठं दुःख कुणाचंच असू शकत नाही', असं म्हणत सुप्रिया सुळे यांना थेट उत्तर दिल.
त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी देखील सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "अजित पवार यांची राष्ट्रवादी सरकारचा भाग आहे. त्यांनी यावर आवाज उठवणे गरजेचे होते. त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने सगळे गप्प राहिले. मी हात जोडून सांगते की आजपासून अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने मी यापुढे कधीही बोलणार नाही. वहिनी सुनेत्रा पवार यांनी राजकारण करू नका, असे सुनावल्यानंतर आम्ही बोलणारच नाही." , असे रागाच्या भरातच सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "अजित दादांच्या जाण्याच दुःख किती आहे हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार. अजित दादांच्या अपघाताच राजकारण करू नका. आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांना ही आपण वेळ दिला पाहिजे यात. दादांची आई… दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार? पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही सभागृहात सांगितले आहे, त्यांना ही आम्ही भेटलो आहे… सगळ्यांनाच वाटत आहे की काही तरी निर्णय आम्हाला पाहिजे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत शकतो. दादांच्या जाण्याच राजकारण कुणीच करू नये असे मला वाटते. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का असे मला वाटते. सतत मीडियामध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. लवकरात लवकर चौकशी व्हावी असे आम्हाला ही वाटते आम्ही तसे प्रयत्न करतो आहे."