रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय संपला असला तरी रायगडात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष कायम असल्याचं चित्र आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार होता असं सूचक वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलं होतं. त्याला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पालकमंत्रीपदाला एवढा उशीर का झाला याचं आत्म परीक्षण सुनील तटकरे यांनी करावं उगीच त्याचं श्रेय घेऊ नये, भरत गोगावले यांना पालकमंत्री करायला सुनील तटकरे यांचाच विरोध होता असं महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे. पालकमंत्रीपद हा आमचा अधिकार होता तो आम्हाला मिळाला असं दळवी म्हणाले.
यावेळी महेंद्र दळवी यांनी म्हटलं की, "पालकमंत्रीपदाचे श्रेय सुनील तटकरेंनी घेऊ नये. तटकरेंनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. त्यांनी उगीच याबाबत श्रेय घेऊ नये. भरत गोगावले हे सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्ते आणि नेते आहेत. शिवाय सर्वाधिक जनाधार आमच्याकडे असल्यामुळे तो आमचा अधिकार होता आणि तो आम्हाला मिळाला. आम्हाला त्यांच्या शुभेच्छांची अपेक्षा सुद्धा नाही. सुनील तटकरे हे दुसऱ्यांच्या कार्यक्रमात खोडा घालणारे व्यक्तिमत्त्व आहेत."
"आम्ही पक्षाच्या पडत्या काळातील आमदार. मी मंत्री पदासाठी आशावादी. आम्ही पक्षाला पडत्या काळात साथ देणारे पहिल्या फळीतील आमदार आहोत. पक्षाने आम्हाला भरत गोगावले यांच्या रूपाने एक मंत्री दिलेला आहे, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना मला मंत्रिपद मिळावे अशी आशा आहे. मीसुद्धा याबाबत आशावादी आहे. येणाऱ्या काळात पक्ष माझ्यासाठी नक्कीच विचार करेल. राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही." तसेच भाजप आणि आमचे विचार जुळतात." असे स्पष्ट करत रायगडमध्ये तिन्ही पक्षांच्या एकत्रित काम करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जोरदार आगपाखड केली.