बुलढाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी कडक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 168 अन्वये ही नोटीस देण्यात आली असून, आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः तुपकरांना ही नोटीस बजावली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने प्रतिकात्मकरीत्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने आता आंदोलन आणखी तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अशा नोटीसींना आम्ही घाबरत नाही, 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच, असा ठाम विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! साखरेच्या दरात मोठी घसरण; क्विंटलमागे तब्बल 700 ते 800 रुपयांची कपात