Revanth Reddy : तेलंगणात मोठा राजकीय भूकंपाचे संकेत? मुख्यमंत्री रेवंत रेड्डी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ तापले

सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये आगामी ‘ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका’ (GHMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
Revanth Reddy : तेलंगणात मोठा राजकीय भूकंपाचे संकेत? मुख्यमंत्री रेवंत रेड्डी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ तापले

Telangana Revanth Reddy BJP Entry Rumours : तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात सध्या एका खळबळजनक विधानाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी हे काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. भाजपाचे निझामाबादचे खासदार धर्मपुरी अरविंद यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याबाबत एक अत्यंत मोठा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, तसेच मोठे पाऊल रेवंत रेड्डी तेलंगणात उचलून काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात, असे संकेत खासदार अरविंद यांनी दिले आहेत.

पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजतंय; मोदींच्या 'त्या' विधानाचा संदर्भ
काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत एक सूचक आणि मिश्कील विधान केले होते. रेवंत रेड्डी यांच्याकडे पाहत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे, तिथे कदाचित तुम्ही पोहोचू शकणार नाही… त्यापेक्षा तुम्ही माझ्याशीच जोडले गेलेले बरे.” पंतप्रधानांच्या या विधानावर तेव्हा रेड्डी केवळ हसले होते. या विधानाचा संदर्भ देत खासदार अरविंद म्हणाले की, "मी पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता असल्याने या विधानाचा अचूक अर्थ मला सांगता येणार नाही. पण पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजत असून तेलंगणात लवकरच शुभेंदु अधिकारी पॅटर्न पाहायला मिळू शकतो."

ज्येष्ठ नेत्यांना डावलणे काँग्रेसला पडणार महाग?
खासदार धर्मपुरी अरविंद यांनी काँग्रेसच्या हायकमांडवर (केंद्रीय नेतृत्व) थेट निशाणा साधला आहे. अनेक दशकांपासून पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आणि एकनिष्ठ राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून रेवंत रेड्डी यांना थेट मुख्यमंत्री करणे ही काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती, असे अरविंद म्हणाले. यामुळे पक्षात अंतर्गत पातळीवर मोठी नाराजी पसरली असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. ज्याप्रमाणे शुभेंदु यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट ममता बॅनर्जींसमोर तगडे आव्हान उभे केले, तसेच काहीसे चित्र आता तेलंगणात उभे ठाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Criminal Contempt Notice: दिल्ली हायकोर्टाचा 'आप' नेत्यांना दणका; 'या' प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसौदिया यांना नोटीस

आगामी निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होणार
आगामी विधानसभा निवडणुकांचा दाखला देत खासदार अरविंद यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, २०२८-२९ च्या निवडणुकीत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा ऐतिहासिक आणि दारूण पराभव होईल. यापूर्वी १९८५ आणि १९९४ मध्ये काँग्रेसची जशी वाताहत झाली होती, त्याहूनही वाईट स्थिती यावेळी पक्षाची असेल. पुढील २ वर्षांत तेलंगणाच्या राजकारणात एक मोठा 'हाय व्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळेल आणि शेवटी भाजप तिथे पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी वातावरण पेटले
सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये आगामी ‘ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका’ (GHMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अशा संवेदनशील काळात भाजप खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांच्या पक्षांतराचा दावा केल्यामुळे तेलंगणातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता भाजपच्या या अत्यंत आक्रमक दाव्यावर स्वतः मुख्यमंत्री रेवंत रेड्डी किंवा काँग्रेसचे हायकमांड काय प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा – Finance Ministry Budget Cuts : सरकारी बँका, वित्तीय संस्था, सरकारी विमा कंपन्यांना खर्च कपातीचे उपाय तातडीने लागू करण्याचे आदेश; पीएम मोदींच्या आवाहनानंतर आता…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version