Tejaswi Ghosalkar Displays Abhishek Ghasalkar Photo on BJP Election Poster : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहिसरमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता त्यांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले असून सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे.
विवादाचे मुख्य कारण
तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या प्रचाराच्या पोस्टर्सवर त्यांचे दिवंगत पती आणि ठाकरे गटाचे निष्ठावान नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. अभिषेक घोसाळकर हयात असताना त्यांनी कधीही ठाकरे गटाची साथ सोडली नव्हती, मग त्यांच्या फोटोचा वापर भाजपच्या प्रचारासाठी कसा काय होऊ शकतो? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
शिवसैनिकांचा संताप आणि खोचक सवाल
तेजस्वी घोसाळकर यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "अभिषेकदादांनी मरणोत्तर भाजपात प्रवेश केलाय का?" असा टोमणा मारत शिवसैनिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राजकीय फायद्यासाठी दिवंगत नेत्यांच्या प्रतिमेचा वापर करणे हे नीतिमत्तेला धरून नसल्याचा आक्षेप शिवसैनिकांनी नोंदवला आहे.
हेही वाचा – Raigad Crime News: रायगड हादरले! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं; सकाळच्या सुमारास घडला थरार
घोसाळकर कुटुंबातील फूट
तेजस्वी घोसाळकर यांनी 15 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. घराण्यातील एका सदस्याने भाजपची वाट धरल्याने घोसाळकर कुटुंबात आणि दहिसरच्या राजकारणात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे
पश्चिम उपनगरात भाजपचे वर्चस्व आधीपासूनच आहे, त्यातच तेजस्वी घोसाळकर यांच्या रूपाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसर-मागाठाणे पट्ट्यात गेल्या काही महिन्यांत ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात घटली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हा भाग काबीज करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे. या वादामुळे दहिसरमधील राजकीय वातावरण अधिकच धगधगत राहण्याची शक्यता आहे. भाजप आणि ठाकरे गट या पोस्टर युद्धावरून समोरासमोर आले आहेत.
हेही वाचा – Pune BJP: पुणे भाजपची पहिली यादी तयार! 100 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब; आज होणार अधिकृत घोषणा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.