CM Vijay: बहुमत चाचणीपूर्वी CM विजय यांच्या ‘त्या’ आमदाराला धक्का; मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच एक मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
CM Vijay: बहुमत चाचणीपूर्वी CM विजय यांच्या ‘त्या’ आमदाराला धक्का; मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

CM Joseph Vijay Floor Test : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच एक मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. तिरुपत्तूर मतदारसंघातून अवघ्या एका मतानं विजय मिळवणारे टीव्हीके (TVK) पक्षाचे आमदार सीनिवासा सेतुपती यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानात सहभागी होता येणार नाही, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. पराभूत द्रमुक उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. विजय यांना 13 मे रोजी आपली ताकद सिद्ध करायची असून, त्यापूर्वीच एका आमदाराचे मताधिकार गोठवले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संख्याबळाचे गणित आणि टीव्हीकेची स्थिती
तामिळनाडू विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 आमदारांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत, परंतु विजय स्वतः 2 मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांच्या पक्षाचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 आमदारांचे आहे. अशा परिस्थितीत त्यांना बहुमतासाठी अजून 11 आमदारांची गरज आहे. सेतुपती यांच्यावरील बंदीमुळे पक्षापुढील आव्हाने तांत्रिकदृष्ट्या वाढली असली, तरी विजय यांनी विविध लहान पक्षांशी आणि अपक्ष आमदारांशी संधान साधून सरकार वाचवण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.

हेही वाचा – CM Vijay OSD: ज्योतिषी राधन पंडित यांची मुख्यमंत्री विजय यांचा 'OSD' म्हणून नियुक्ती; त्यांच्या एका सल्ल्याने कशी फिरली सत्तेची चक्रे? वाचा

लहान पक्षांचा पाठिंबा आणि 'विजय'मार्ग
मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मित्रपक्ष पुढे आले आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला असून CPI (2), CPI (M) (2), VCK (2) आणि IUML (2) या पक्षांची 8 आमदारांची शक्तीही विजय यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. या सर्व पक्षांच्या मदतीने विजय बहुमताचा आकडा पार करू शकतात. आमदारावर झालेल्या न्यायालयीन कारवाईमुळे विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी सत्ताधारी गटाने बहुमताचा विश्वास व्यक्त केला आहे.

अण्णाद्रमुकच्या बंडखोर आमदारांचा फॅक्टर
राजकीय नाट्यात सर्वात मोठा ट्विस्ट अण्णाद्रमुकच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे. अण्णाद्रमुकचे एकूण 47 आमदार असून त्यापैकी सुमारे 30 आमदारांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे अण्णाद्रमुकने निवडणुकीत विजय यांच्या विरोधात लढा दिला होता; तरीही, त्यांच्यातील मोठी फळी आता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभी राहताना दिसत आहे. यामुळे सेतुपती यांच्या मतदानावर बंदी येऊनही विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – Sujit Bose : बंगालमध्ये सत्तांतर होताच ईडी ॲक्शन मोडमध्ये; माजी मंत्री सुजित बोस यांना अटक, टीएमसीला मोठा हादरा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version