शिवसेनेत गेल्या कित्येक दिवसांपासून नाराजीनाट्य असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधुंची युती झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. यावेळी वॉर्ड क्रमांक 192 साठी राज ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले असून त्यानंतर शिवसेनेतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याच्या चर्चा होत होत्या. अशातच आता शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात राजीनामा सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासाठी वरळी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यात मुंबई महानगपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.
वॉर्ड क्रमांक 193 साठी यावेळेस देखील हेमांगी वरळीकर यांनाच संधी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान गेले 17 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील सूर्यकांत कोळी यांना संधी न देता पुन्हा एकदा हेमांगी वरळीकर यांनाच संधी दिली जाणार असल्याचमुळे सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे. सूर्यकांत कोळी यांच्या राजीनाम्यानंतर इतर शाखा प्रमुखांमध्येही असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी ठरवताना स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत वाढत्या असंतोषाचा शाखा पातळीवर फटका बसण्याची शक्यता आहे.