Suraj Chavhan Reaction on mimicry : ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात सूरज चव्हाणची नक्कल, व्यक्त केली नाराजी, म्हणाला, माझं मन दुखलंय.. लई म्हंजे लई..

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण 'झी चित्र गौरव पुरस्कार' 2026 सोहळ्यात न बोलावल्यामुळे कमालीचा नाराज झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली.
Suraj Chavhan Reaction on mimicry : ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात सूरज चव्हाणची नक्कल, व्यक्त केली नाराजी, म्हणाला, माझं मन दुखलंय.. लई म्हंजे लई..

Suraj Chavan on Zee Chitra Gaurav : मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रतिष्ठेच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ 2026 सोहळ्यात एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाण मात्र कमालीचा नाराज झाला आहे. या सोहळ्यात सूरजची नक्कल करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले, मात्र खुद्द सूरजला या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली आहे. “माझं मन दुखलंय,” असे म्हणत सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला सूरज चव्हाण?
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात एका स्किट दरम्यान सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपुक’ आणि ‘बुक्कीत टेंगूळ’ या गाजलेल्या संवादांची नक्कल करण्यात आली. हे सादरीकरण पाहून सूरजला आनंद झाला असला तरी, त्याला या मोठ्या सोहळ्यासाठी बोलावले न गेल्याने त्याने दुःख व्यक्त केले. तसेच, वाहिनीकडून त्याला साधा फोन किंवा मेसेजही आला नसल्याचे त्याने नमूद केले.

सूरज म्हणाला, ‘नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका सुरज चव्हाण. काही कारणाने आज मी व्हिडिओ बनवतोय, कारण माझं मन दुखलंय.. लई म्हंजे लई.. कारण झी मराठीवर एक कार्यक्रम झाला. झी चित्र गौरव. या कार्यक्रमात माझी एक्टिंग बघून मला आनंद झाला. पण मला एक खंत आहे. इतकं लागलंय ना मनाला की.. एवढा मोठा शो आहे झी चित्र गौरव. एवढं मोठं माझं कॅरॅक्टर केलंय. त्यांना मला काही बोलायचं नाही. ती खूप मोठी लोकं आहेत. पण मला त्या कार्यक्रमाच्या कुठलातरी कोपऱ्यात बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं की मला बोलावलंय तरी… पण त्यांच्याकडून मला कुठला कॉलही आला नाही. बोलावलंही नाही. यामुळे माझं मन इतकं दुखलंय ना, की ते फक्त माझ्या मनाला माहितीये. फॅन लोकांनो, मी तुम्हाला देव मानतो. तुमच्यामुळे मी मोठा स्टार आहे. हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांमुळे झालं आहे. त्यांनी एक नंबर कॅरेक्टर केला आहे सूरज चव्हाणचं.. मलाही आनंद आहे, माझे फॅन खुदुखुदु हसतायत पोट धरून.. मला अभिमान आहे. पण मला एक खंत आहे की, एकातरी बाजूला मी पाहिजे होतो कुठेतरी. एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही. ” असे सूरजने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

चाहत्यांना विचारला सवाल: ‘मला बोलवायला हवं होतं की नाही?’
सूरज चव्हाणने आपल्या चाहत्यांना ‘देव’ मानत त्यांनाच या वादात साद घातली आहे. तो म्हणाला, “माझ्या फॅन लोकांनो, तुम्ही सांगा त्यांनी मला तिथे बोलवायला पाहिजे होतं की नाही?” सुरजच्या या प्रश्नानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला असून त्याचे चाहते त्याच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. काहींनी वाहिनीला ट्रोल केले आहे, तर काहींनी सूरजची समजूत काढत त्याला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – Zakir Khan Hospitlize :प्रसिध्द स्टॅंडअप कॉमेडियन झाकीर खान रूग्णालयात भरती, समोर आला व्हिडीओ, चाहते चिंतेत

मूळ व्यक्तीचीच नक्कल होते; चाहत्यांचा आधार
सुरजच्या या भावनिक व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक चाहत्यांनी त्याला धीर दिला आहे. “तू ओरिजिनल ब्रँड आहेस, म्हणून तुझी नक्कल झाली. काळजी नको करू, आम्ही तुझ्यासोबत आहोत,” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सुरजचे सांत्वन केले आहे. सूरजने ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता शिखरावर पोहोचली असून, अशा मोठ्या पुरस्कार सोहळ्यात त्याला डावलले गेल्याने त्याचे चाहते संतप्त झाले आहेत. झी मराठी वाहिनी आता यावर काही स्पष्टीकरण देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतेच पार पडलेय सूरजचे लग्न
सुरज चव्हाण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. त्याने नुकताच संजनासोबत विवाहबंधनात प्रवेश केला असून त्याच्या नवीन घराचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. एका बाजूला वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण येत असताना, व्यावसायिक क्षेत्रातील या अपमानास्पद वागणुकीमुळे सुरज कमालीचा भावूक झाला आहे. केदार शिंदे यांच्या ‘झापुक झूपूक’ चित्रपटात झळकलेला हा ‘गुलीगत किंग’ आता आपल्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी सज्ज होत असतानाच या नव्या वादामुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या त्या सीनमुळे अडचणीत वाढ; धुरंधर 2 चित्रपटाच्या निर्मात्याला शीख समुदायानं पाठवली कायदेशीर नोटीस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version