Sujay Vikhe Patil: महामार्गावरील खड्ड्यांचं खापर ट्रम्प यांच्या डोक्यावर; भाजप नेत्याचा अजब दावा, ‘ट्रम्पमुळे महामार्गाचं काम रखडलं…

नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडण्यामागे ट्रम्प यांच्या धोरणांचा अप्रत्यक्ष परिणाम असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला

Sujay Vikhe Patil: महामार्गावरील खड्ड्यांचं खापर ट्रम्प यांच्या डोक्यावर; भाजप नेत्याचा अजब दावा, ‘ट्रम्पमुळे महामार्गाचं काम रखडलं…

नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे क्रूड ऑईलचा पुरवठा प्रभावित झाला, त्याचा परिणाम रिफायनरीच्या कामकाजावर आणि पुढे डांबराच्या उपलब्धतेवर झाला, त्यामुळे नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याचा अजब दावा विखे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही, तर या परिस्थितीमुळे काही लोक अधिक दारू पिऊ लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, स्थानिक पातळीवर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विखे पाटलांनी ट्रम्प यांना का जबाबदार धरले?

रस्त्याचे काम रखडण्यामागील कारण स्पष्ट करताना सुजय विखे पाटील यांनी जागतिक पातळीवरील घडामोडींचा संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणशी संबंधित संघर्षामुळे क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे तेल शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊन डांबराची उपलब्धता कमी झाली आणि त्याचा परिणाम रस्ते बांधकामावर झाला.

विखे पाटील यांनी क्रूड ऑईलपासून पेट्रोल आणि डिझेलसह विविध उत्पादने तयार होतात आणि त्याच प्रक्रियेतून मिळणाऱ्या घटकांचा डांबर निर्मितीसाठी वापर होतो, असा युक्तिवाद केला. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे रस्ते कामासाठी लागणाऱ्या डांबराची उपलब्धता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘ट्रम्पमुळे काही लोक दारू जास्त प्यायला लागले’

या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी ट्रम्प यांच्या बदलत्या भूमिकेवरही टीका केली. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाचा परिणाम भारतातील काही लोकांच्या मद्यपानाच्या सवयींवरही झाला आणि काही लोक अधिक दारू पिऊ लागल्याचा दावा त्यांनी केला. या विधानामुळे त्यांच्या भाषणाचा हा भाग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number