शिवसेना पक्षाची दादर मधील शिवाजी पार्कला दसरा मेळावा करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. मागच्यावर्षी शिंदे गट व ठाकरे गट यांत दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू होता, हा वाद इतका ताणला गेला की, तो न्यायालयापर्यंत येऊन ठेपला म्हणून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेले. मात्र यावर्षी कोणत्या गटाचा दसरा मेळावा तेथे संपन्न होणार याची चाहूल लागली असता, एक मोठी अपडेट समोर आली आहे.
यंदाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानासाठी (शिवाजी पार्क) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ठाकरेंच्या सेनेला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या मैदानासाठी ठाकरेंच्या सेने व्यतिरिक्त शिंदे गट व इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा अर्ज आला नसल्याने महापालिकेने तत्काळ ही मंजुरी ठाकरे गटाला दिली आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.
या मंजुरीमुळे येत्या 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा आता कुठे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.