नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या सुनावणीवर घमासान सुरू असून ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आज, १९ ऑगस्ट रोजी आपला युक्तिवाद संपवला. गेल्या काही दिवसांपासून कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत होते. आज त्यांनी आपला युक्तिवाद संपवला असून शिंदे गटाचे वकील कामत आता पक्षाची बाजू मांडतील. दरम्यान, आजची सुनावणी संपली असून उद्या, २० ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहेत. आज झालेल्या सुनावणीतही वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले असून शिवसेना चिन्हच गोठवण्याची मागणी न्यायालयात केली आहे.
काय म्हणाले कपिल सिब्बल
शिवसेना पक्ष ठाकरेंचा आहे, तो एकनाथ शिंदे यांचा पक्ष होऊच शकत नाही. त्यामुळे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांचे होऊच शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मोठी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. पक्ष कुणाचे आणि चिन्ह कुणाचे असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आणि त्यावर गेली चार वर्षे कायदेशीर खल सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या युक्तिवादाच्या अखेरच्या क्षणी धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवले पाहिजे, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. त्याआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाने घालून दिलेले नियम कसे पायदळी तुडवले, हे सांगण्याचा प्रयत्न सिब्बल यांनी केला.
तसेच सिब्बल पुढे म्हणाले की, कृपया 'दहाव्या अनुसूची'चा अर्थ असा लावू नका की ज्यामुळे पक्षांतर करण्यास मुभा मिळेल. कारण तसे करणे हा एक प्रकारचा गुन्हाच ठरेल. कर्नाटक प्रकरणातील निकालातही हेच नमूद केले आहे. जर तुम्ही असे म्हणत असाल की १९ जुलै नंतर त्यांना (शिंदे गटाला) इतका पाठिंबा मिळाला आहे. तर तुम्ही अप्रत्यक्षपणे पक्षांतरालाच प्रोत्साहन देत आहात. मी माननीय न्यायालयाला विनंती करतो की, 'शिवसेना' हे नाव ठाकरे यांच्याच मालकीचे आहे आणि शिंदे गटाला ते पक्षचिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा वापर करणे ही काही न्याय्य हक्काची बाब नाही. तो त्या चिन्हाचा अनधिकृत वापर आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले पाहिजे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि आम्हालाही मिळू शकत नसेल, तर ते गोठवणे हाच एकमेव पर्याय उरतो. एखादी बेकायदेशीर कृती करून ते स्वतःसाठी कोणताही कायदेशीर किंवा न्याय्य हक्क निर्माण करू शकत नाहीत, असे सिब्बल म्हणाले.